लग्नाआधी HIV तपासणी बंधनकारक, सरकारचा नवा कायदा लवकरच

| Updated on: Jul 09, 2019 | 7:08 PM

गोवा सरकार लवकरच एक कायदा आणत आहे. यानुसार गोव्यात लग्नाआधी एचआयव्ही तपासणी (HIV Test) बंधनकारक असणार आहे.

लग्नाआधी HIV तपासणी बंधनकारक, सरकारचा नवा कायदा लवकरच
या दोन ब्लड ग्रुपच्या लोकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज
Follow us on

पणजी : गोवा सरकार लवकरच एक कायदा आणत आहे. यानुसार गोव्यात लग्नाआधी एचआयव्ही तपासणी (HIV Test) बंधनकारक असणार आहे. गोव्याचे आरोग्य आणि कायदामंत्री विश्वजीत राणे यांनी सरकार लग्नाच्या नोंदणीपूर्वी एचआयव्ही तपासणी अनिवार्य करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. यावर कायदा विभागाची सुचनाही मागवण्यात आली आहे.

गोव्याचे आरोग्यमंत्री राणे म्हणाले, “सध्या या कायद्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या कायद्याच्या प्रस्तावाला लवकरच वेगवेगळ्या विभागांकडे पाठवण्यात येईल. सविस्तर विचारविनिमय केल्यानंतरच हा प्रस्ताव निश्चित केला जाईल. संबंधित विभागाची मंजूरी मिळाल्यानंतरच आम्ही विधानसभेच्या मान्सून सत्रात हा कायदा करु.” गोव्याचे मान्सून सत्र 15 जुलैपासून सुरु होत आहे.

या कायद्यासोबतच थॅलीसिमियाची तपासणीही बंधनकारक करण्याचा विचार आहे. त्यामुळे हा आजार असलेल्या आई वडिलांपासून मुलांना होणारा संसर्ग रोखता येईल, असेही मत राणे यांनी व्यक्त केले. तसेच हे दोन्ही कायदे एकाचवेळी लागू व्हावेत यासाठी आपण आग्रही असल्याचेही त्यांनी नमूद केले. गोवा प्रगतिशील राज्य असल्याने हे शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याआधी 2006 मध्येही हा प्रयत्न झालेला

गोव्यात लग्नाआधी एचआयव्ही तपासणीच्या कायद्याची चर्चा याआधीही झालेली आहे. याआधी 2006 मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री दयानंद नार्वेकर यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी गोवा कॅबिनेटने लग्नाआधी एचआयव्ही तपासणीच्या कायद्याला मंजूरीही दिली होती. मात्र, या कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी होऊ शकली नाही.