विदर्भात उष्णतेची लाट, मान्सून उशिराने : हवामान विभाग

| Updated on: Jun 05, 2019 | 9:30 AM

विदर्भातील नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

विदर्भात उष्णतेची लाट, मान्सून उशिराने : हवामान विभाग
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नागपूर : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या उकाड्याने त्रस्त आहे. मान्सूनपूर्व पावसाने राज्यात हजेरी लावल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. मात्र, विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस पुन्हा उष्णतेची लाट कायम राहाणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे.

विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेची लाट राहाणार, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. इतकंच नाही तर हवामान विभागाकडून विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सून उशिराने येत असल्याने आणखी काही दिवस विदर्भात उकाडा कायम राहाणार आहे. विदर्भात मान्सून आठवडाभर उशिराने येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात येत्या 15 ते 16 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असंही हवामान विभागाने सांगितलं.

दुसरीकडे, विदर्भात मान्सून उशिराने येणार असला, तरी केरळात येत्या काही तासात मान्सूनचं आगमन होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणपणे 6 ते 7 जूनला मान्सून केरळात दाखल होईल. मान्सूनसाठी अरबी समुद्रातील वाऱ्याची अनुकूलता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ढगही जमा होऊ लागले आहेत, असं हवामान विभागाने सांगितलं.

मान्सून केरळात दाखल झाल्यावर साधारण सहा दिवसात राज्यात दाखल होतो. त्यामुळे 12 तारखेला महाराष्ट्रात मान्सून बरसेल. मात्र वातावरण अनुकूल असल्यास त्यापूर्वीही पावसाची शक्यता आहे. मात्र, विदर्भात उशिरोने मान्सून दाखल होणार आहे.

देशात यंदा 96 टक्के म्हणजे सामान्य पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तर राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता होती. मात्र सध्याची मान्सूनची अनुकूल परिस्थिती पाहता राज्यात यंदा 100 टक्के पाऊस बरसणार आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

विदर्भात उष्णतेची लाट

नागपुरात उष्माघातामुळे आतापर्यंत 13 पेक्षा जास्त जणांनी जीव गमावला आहे. नागपूरसह चंद्रपुरातही उन्हाने कहर माजवला आहे. चंद्रपुरात 48 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांची उन्हामुळे लाहीलाही होत आहे. हीच परिस्थिती विदर्भात आणखी काही दिवस कायम राहाणार आहे.

VIDEO :