परदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला

| Updated on: Jan 29, 2020 | 10:25 PM

महिनाभरात राज्यातील कांद्याची आवक वाढल्यामुळे परदेशातून मागविलेल्या 18 हजार टन कांद्यांपैकी तब्बल 7 हजार टन कांदा जेएनपीटी बंदरात सडत पडला आहे

परदेशातून आणलेला 7 हजार टन कांदा सडला
Follow us on

नवी मुंबई : कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात केली (Onion Price). मात्र, गेल्या महिनाभरात राज्यातील कांद्याची आवक वाढल्यामुळे परदेशातून मागविलेल्या 18 हजार टन कांद्यांपैकी तब्बल 7 हजार टन कांदा जेएनपीटी बंदरात सडत पडला आहे (Imported Onion Rotten ). 250 पेक्षा अधिक कंटेनरमध्ये साठवून ठेवलेला हा कांदा जेएनपीटी परिसरात असलेल्या वेगवेगळ्या कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये (CFS) ठेवण्यात आला आहे. हा कांदा सडू लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरु लागली आहे (Rotten Onion).

राज्यात कांद्याच्या भावाने शंभरी गाठली, तेव्हा केंद्र सरकारकडून इजिप्त, तुर्की आणि थायलंडमधून कांद्याची आयात केली होती. त्यावेळी कांद्याचे भाव 40 ते 45 रुपये प्रतिकिलो होते. कांद्याचा साठा बाजार रोखण्यासाठी आणि दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने इजिप्त आणि तुर्कीतून कांदा मागविला होता. त्यावेळी 18 हजार टन कांद्याची आयात करण्यात आली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात या कांद्याची विक्री 20 ते 30 रुपये किलोपर्यंत झाली. हा कांदा स्वस्त दरात उपलब्ध होत असल्यामुळे त्याची आवक वाढविली.

मात्र, महिनाभरात राज्याच्या विविध भागांतून कांद्याची आवक वाढली. त्यामुळे परदेशातून मागविलेल्या कांद्याच्या साठ्यापैकी तब्बल 7 हजार टन कांदा जेएनपीटी परिसरात असलेल्या सिएफएसमध्ये सडत पडला असल्याचं चित्र आहे. यापैकी काही कांद्यांना मोठा कोंब आल्यामुळे, तर काही कांदे सडल्यामुळे तो फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी माहिती आयात व्यापाऱ्यांनी दिली आहे.

इजिप्त आणि तुर्की या देशातून महाराष्ट्रात आयात करण्यात आलेला कांदा चवीला कडू लागत असल्यामुळे ग्राहक या कांद्याला खरेदी करत नाहीत. तसेच, हा कांदा भाजीत वापरल्यास भाजीला काळसर रंग येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या. त्यामुळे ग्राहक हा परदेशी कांदा विकत घेण्यास फारसे तयार नसल्याचं घाऊक व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.

सध्या राज्यातील कांद्याची आवक मुबलक प्रमाणात होत असून ग्राहकांना परवडेल अशा दरात कांद्याची विक्री होत आहे. मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर आलेला परदेशी कांदा विकत घेण्याऐवजी आता सर्वसामान्य नागरिकांसह, हॉटेलचालक महाराष्ट्रातील कांदा विकत घेण्यास प्राधान्य देत आहेत.

कांदा मार्केटमध्ये परदेशातून आलेल्या कांद्याची उठाव नसल्याने कांदा गोण्यामध्ये पडून सडला आहे. घाऊक बाजारात आपल्या कांद्याला 25 ते 30 रुपये किलोचा दर मिळाला असून कांद्याच्या 115 गाड्यांची आवक झाली आहे. मात्र, तरीदेखील कांद्याला हवा तसा उठाव मिळाला नसल्याचे व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.