पाकिस्तानचा पुळका, भारताने तुर्कीचा शस्त्र पुरवठा थांबवला

| Updated on: Oct 23, 2019 | 7:52 PM

तुर्कीची (Arms exports Turkey) पाकिस्तानशी जवळीक पाहता या शस्त्रांचा स्वतःच्या हितासाठी वापर केला जाऊ शकतो या भीतीने भारताने तुर्कीचा पुरवठा बंद केला आहे.

पाकिस्तानचा पुळका, भारताने तुर्कीचा शस्त्र पुरवठा थांबवला
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानप्रेमात डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेल्या तुर्कीबाबत भारताने मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने तुर्कीला (Arms exports Turkey) पुरवले जाणारे सैन्य साहित्य आणि शस्त्र पुरवठा बंद केला आहे. तुर्कीची (Arms exports Turkey) पाकिस्तानशी जवळीक पाहता या शस्त्रांचा स्वतःच्या हितासाठी वापर केला जाऊ शकतो या भीतीने भारताने तुर्कीचा पुरवठा बंद केला आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने याबाबतचं वृत्त दिलंय.

याचदरम्यान तुर्कीच्या राष्ट्रपतींचा नियोजित पाकिस्तान दौराही पुढे ढकलण्यात आलाय. तुर्कीवर भारतासह विविध देशांकडून आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. कारण, तुर्कीने सीरियातील कुर्दीश प्रणित सैन्यावर हल्ले सुरु केले आहेत. उत्तर पूर्व सीरियात तुर्कीने केलेल्या कारवाईचा भारताने तीव्र शब्दात निषेध केला होता.

ईटीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्कीला पुरवले जाणारे संवेदनशील साहित्य सध्या थांबवण्यात आलं असून त्यावर आता निर्णय होण्याची कोणतीही शक्यता नाही. तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यीप एर्डागन यांचे काश्मीवर दिलेले विविध वक्तव्य आणि पाकिस्तानला होणारा शस्त्र पुरवठा या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

तुर्कीला पुरवल्या जाणाऱ्या सैन्य साहित्याचं प्रमाण कमी आहे. मात्र दुहेरी वापर साधने म्हणजेच डिटोनेटर, फ्यूज, बांधकाम साहित्यासाठीची आणि खाणीची स्फोटके यांचा निर्यात साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

सीरियातील दहशतवादी गट आयसिसकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांवर Conflict Armament Research ने 2017 मध्ये एक शोध अहवाल प्रसिद्ध केला होता. आयसिसकडून आयईडी स्फोटासाठी वापरली जाणारी स्फोटके ही भारतातून आली असल्याचं यावेळी समोर आलं होतं. विशेष म्हणजे ही स्फोटके भारताने तुर्कीला निर्यात केलेली होती. तुर्कीतून पुढे ही स्फोटके विविध देशांना देण्यात आल्याचं बोललं जातं.

पाकिस्तानचा पारंपरिक मित्र असलेल्या तुर्कीसोबत संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 पासून पुढाकार घेतला. तुर्कीच्या राष्ट्रपतींनी 2017 ला सत्तेत आल्यानंतर पहिलाच दौरा भारताचा केला होता. याच दौऱ्यानंतर व्यापारी संबंधही सुधारले आणि दहशतवादावर काम करण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला.

भारताने काश्मीरमधील कलम 370 काढल्यानंतर मलेशिया आणि तुर्कीने जी वक्तव्य केली, त्यामुळे भारतातही अस्वस्थता आहे. मुस्लीम सहयोग संस्था म्हणजेच ओआयसीच्या अनेक सदस्य देशांनी स्वतःला कलम 370 च्या घडामोडींपासून दूर ठेवणंच पसंत केलं. पण मलेशिया आणि तुर्कीने या प्रकरणी पाकिस्तानला साथ दिली.