इस्रो 2021 पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवणार

| Updated on: Sep 22, 2019 | 8:27 AM

भारत 2021 पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवेल, अशी घोषणा इस्रोचे (ISRO) प्रमुख के. सिवन (K Sivan) यांनी केली.

इस्रो 2021 पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवणार
Follow us on

भुवनेश्वर: भारत 2021 पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात (Indian Human Spaceflight Programme) पाठवेल, अशी घोषणा इस्रोचे (ISRO) प्रमुख के. सिवन (K Sivan) यांनी शनिवारी (21 सप्टेंबर) केली. ते आयआयटी भुवनेश्वरच्या (IIT, Bhubaneshwar) आठव्या पदवीदान कार्यक्रमात बोलत होते. सिवन म्हणाले, “डिसेंबर 2021 पर्यंत भारत स्वतःच्या रॉकेटमध्ये पहिल्या भारतीयाला अंतरळात पाठवेल. हे आमचं ध्येय आहे. इस्रोतील प्रत्येकजण यासाठी काम करत आहे.”

इस्रोने (ISRO) यासाठी आपली महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेची (Gaganyaan Mission) घोषणा केली आहे. त्याअंतर्गत कमीतकमी 7 दिवसांसाठी 3 सदस्यीय पथकाला अंतराळात पाठवले जाईल. या मोहिमेची घोषणा प्रथम पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 2018 च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केली होती. भारत 2021 पर्यंत एका भारतीयाला अंतराळात पाठवण्याच्या ध्येयासोबत इतरही काही ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करत आहे. गगनयान मोहिमेच्या आधी इस्रोचं लक्ष्य 2 मानवरहित मोहिमा यशस्वी करण्याचं आहे.

के सिवन म्हणाले, “डिसेंबर 2020 पर्यंत इस्रोकडे पहिली मानवरहित मोहिम तयार असेल. दूसरं मानवरहित मानव अंतराळ विमान जुलै 2021 मध्ये पाठवण्यात येईल. गगनयान मिशन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या मोहिमेमुळे देशाच्या विज्ञान आणि औद्योगिक क्षमतांमध्ये वाढ होईल.”

भारताची गगनयान मोहिम पूर्ण झाल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी मोहिम करणारा भारत चौथा देश असेल. या मोहिमेवर जवळपास 10,000 कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज आहे. भारतीय वायु सेनेने या मोहिमेसाठी अंतराळ यात्रेसाठीच्या अंतराळवीरांची निवडीची प्रक्रिया सुरू केल्याचंही म्हटलं आहे.

चंद्रयान-2 मोहिमेविषयी बोलताना सिवन म्हणाले, “ऑर्बिटर साडेसात वर्षाहून अधिक काळ माहिती पाठवेल. सॉफ्ट लँडिंग सोडून चंद्रयान-2 मधील सर्व काम नियोजित मोहिमेप्रमाणेच सुरू आहे.