तमाम महिलावर्गाची दिलगिरी, अखेर इंदोरीकर महाराजांकडून दिलगिरी व्यक्त!

| Updated on: Feb 18, 2020 | 12:13 PM

सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी (Indorikar Maharaj apologize) व्यक्त केली आहे.

तमाम महिलावर्गाची दिलगिरी, अखेर इंदोरीकर महाराजांकडून दिलगिरी व्यक्त!
Follow us on

शिर्डी : सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी (Indorikar Maharaj apologize) व्यक्त केली आहे. “समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. 26 वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन , समाजसंग्रह , अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी”, असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं आहे. इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन दिलगिरी (Indorikar Maharaj apologize) मागितली आहे.

इंदोरीकर महाराजांची दिलगिरी

रामकृष्ण हरी

महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मातासमान असलेला तमाम महिला वर्ग, आजतागत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल आणि इलेक्ट्रोनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.

तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन अंधश्रद्धा निर्मूलन आणि विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, हीच सदिच्छा!

नेमकं काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज?

इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदोरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.”

इंदोरीकरांना नोटीस

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj controversy) अडचणीत सापडले आहेत. पीसीपीएनडीटीए (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act) कायद्याअंतर्गत त्यांना नोटीस धाडण्यात आली आहे. या वादानंतर इंदुरीकर महाराज अत्यंत उद्विग्न असल्याचं दिसलं होतं. बीड आणि अहमदनगरमध्ये झालेल्या कीर्तन सोहळ्यात, इंदुरीकर महाराजांनी आता कीर्तन बास, शेती करु असं म्हटलं होतं.

कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करुन अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून इंदुरीकर महाराजांना ओळखलं जातं. अनोख्या रोखठोक शैलीमुळे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी होत असते. पण, इंदुरीकर महाराजांनी थेट पुत्रप्राप्तीसंदर्भात वक्तव्य केल्यानं, वादाला तोंड फुटलं आहे. त्याचा परीणाम आता थेट त्यांच्या कीर्तनांवर होऊ लागला

यूट्यूब चॅनल्सवर खापर

यापूर्वी इंदुरीकर महाराजांनी बीडमधील एका कीर्तन सोहळ्यात वादावर भाष्य करताना, यूट्यूब चॅनल्सवर खापर फोडलं होतं.

“यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. आज इंदुरीकर संपवायला निघालेत. पण मी बोलतोय हे खरंच आहे. मी कशात सापडेना म्हणून मला गुतवण्याचा(अडकवण्याचा) प्रयत्न सुरु आहे. मी तर आता या मुद्द्यावर आलो आहे की, एखाद-दुसरा दिवस जाऊ द्यायचा, आता लय झालं, फेटा ठेवून द्यायचा. आपली सहन करायची कपॅसिटी संपली. 26 वर्षे झाली मालक- बायका नाही, पोरगं नाही, रात्रं-दिवस प्रवास कष्ट, कष्ट, कष्ट, कष्ट लोकांसाठी करायचं. दोन-अडीच तासाच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं गेलं, पण मी बोललेलो वाक्य चुकीचं नाही बी. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी ही भागवतातही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय. मी म्हणतोय हे खरंय. तरी लोकं म्हणतायेत याला ठेऊन द्या पहिलं. आणि चारी बाजूला….. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो..आपली आता कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचं, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. बस्स.. आता नको मजा नाही राहिली.

एवढंच जर आपल्यासारख्याला त्रास होत असेल, साधा त्रास.. काड्या करणारी मंडळी ही यूट्यूबवाली मंडळी. यांनीच इंदुरीकरच संपवावा..त्यांना माहीत नाही, यूट्यूब संपेल. यूट्यूबवाल्यांना इंदुरीकराच्या नावाने पैसा मिळाला मोक्कार. मी काय या यूट्यूबचा एक रुपयाही घेतला नाही. ही यूट्यूबवाली मंडळी झाली कोट्याधीश. एक एक लाख लाईक आहेत. पैसाच मोजता येईना, इतका पैसा झालाय. पाहाणाऱ्यांची संख्या खूप आहे.

संबंधित बातम्या

माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज  

राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा 

आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न  

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज

वादानंतर इंदोरीकर महाराजांचं समर्थकांना नम्र आवाहन