गडकरींची मुलाखत : बालपण; आवडतं खाद्य; गाणे ; आयकॉन; हिरो

| Updated on: Sep 07, 2019 | 11:53 PM

नागपूरमधील (Nagpur) दक्षिणामुर्ती गणेश मंडळाने (Dakshinmurti Ganesh Mandal) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची मुलाखत आयोजित केली. जेष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी (Bal Kulkarni) आणि रेणुका देशकर (Renuka Deshkar) यांनी ही मुलाखत घेतली.

गडकरींची मुलाखत : बालपण; आवडतं खाद्य; गाणे ; आयकॉन; हिरो
Follow us on

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या दिलखुलास उत्तरांसाठी प्रसिद्ध आहेत. अशा या मुसद्दी राजकीय नेत्याची मुलाखत नागपूरमधील (Nagpur) दक्षिणामुर्ती गणेश मंडळाने (Dakshinmurti Ganesh Mandal) आयोजित केली. जेष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी (Bal Kulkarni) आणि रेणुका देशकर (Renuka Deshkar) यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या बालपणापासून आवडतं खाद्य, गाणे, आयकॉन यांच्याविषयी मते व्यक्त केली. तसेच समाजकारण, राजकारण आणि कामाची पद्धत यावरही भाष्य केलं.

मुलाखतकारांनी त्यांना त्यांच्या लहानपणी गणपती बसवायचे का असा प्रश्न विचारला. त्यावर गडकरी म्हणाले, “लहानपणी आम्हीही गणपती बसवायचो. आमचा आग्रह बाहेर गणपती बसवण्यासाठी असायचा. त्यावेळी गणपतीत वादविवादही व्हायचे. ते वादविवाद ऐकायला आम्हाला आवडायचं. लहानपणी महाल भागातील याच मैदानावर पोळ्याचा उत्सव भरायचा. आम्ही येथेच क्रिकेट खेळायचो आणि बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन आलू बोंडा खायचो.”

गडकरी आणि खानपान

गडकरी म्हणाले, “आपल्याकडे मिळणारे खाद्यपदार्थ आता विदेशींना देखील आवडायला लागले आहेत. बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नीलाही चना पोहे खाऊ घातले. दिल्लीत मराठी हॉटेल सुरू झाले. त्याठिकाणी आपल्या मराठी खाद्य पदार्थाला मोठी मागणी आहे. लंडनमध्ये ढिशुंम हॉटेल आहे. त्या ठिकाणी मराठी पदार्थ मिळतात. त्या ठिकाणी आता मोठी गर्दी वाढायला लागली आहे. विदेशात मराठी खानपानाला मोठी मागणी वाढली आहे. नागपूरच्या सावजीला ब्रँड बनवलं पाहिजे. त्याचे खूप चाहते आहेत. ”

अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांनी माझ्याकडं जेवण केलं. अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनीला देखील नागपूरचं जेवण आवडतं. अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांना आमच्याकडचे पोहे खूप आवडतात, असंही गडकरींनी नमूद केलं.

‘अधिकाऱ्यांनी लिहून दिलेलं मी वाचत नाही’

गडकरी म्हणाले, ‘मी कुठल्याही कार्यक्रमाला जाताना कागद ठेवत नाही. त्यामुळे माझ्या खात्यातील लोक सुद्धा काळजीत असतात. ते म्हणतात आम्ही तुम्हाला लिहून देतो ते तुम्ही वाचत नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही लिहू नका. मला वाटतं ते मी करतो.”

‘माझा फोटो किंवा कटआऊट लावण्यासाठी एक पैसाही खर्च करत नाही’

मी माझा फोटो किंवा कटआऊट लावण्यासाठी एक पैसाही खर्च करत नाही. लोकांना वाटलं तर ते लावतात, असं मत गडकरींनी व्यक्त केलं. तसेच आपण राजकारणात चांगल्या परंपरा शिकल्या पाहिजे असं सांगत माझे आयकॉन जॉर्ज फर्नांडिस असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

पैसे महत्वाचे की लोकांचे प्राण?

गडकरी यांनी मुलाखतीत नव्या वाहन कायद्यावरही भाष्य केलं. पैसे महत्वाचे की लोकांचे प्राण महत्वाचे आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव जातात. ते रोखण्यासाठी मी प्रयत्न केला. यामुळे या मृत्यूंमध्ये घट होईल, असं वाटलं. पण ते झालं नाही. म्हणून नवा मोटर वाहन कायदा आणावा लागला. दंड तेव्हाच होईल, जेव्हा लोक कायदा मोडतील. कायद्याबद्दल भीती असेल, तरच लोक कायदा पाळतील. कमी दंड असताना लोक पैसे देऊन सुटका करुन घ्यायचे. मात्र, त्यावेळी नियमांचं उल्लंघन व्हायचं. लोकामध्ये जागरूकता निर्माण होईल आणि लोक कायदे मोडणं बंद होईल.”

गणेश उत्सव किंवा नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून चांगले संस्कार देणारे कार्यक्रम व्हायला पाहिजे, अशीही अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली.

‘लोकांच्या आशीर्वादानेच अपघातातून वाचलो’

गडकरी म्हणाले, “कोणालाही मदत केली की ती मदत विसरुन जावं. केलेल्या मदतीची त्याला आठवण करून देऊ नये. मदत करत राहावं. देव आपल्याला आशीर्वाद देतो. मी मदत करत राहतो. त्यामुळेच माझा अपघात झाला तेव्हा लोकांच्या आशीर्वादाने मी वाचलो असं मला वाटतं”

… म्हणून मी अमिताभ बच्चन यांचा फोन कट केला

अमिताभ बच्चन यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवरून जाताना मला फोन केला होता. मात्र, मला ते खोटं वाटलं आणि मी त्यांना फोन ठेवायला लावला. पण त्यांनी मला पुन्हा फोन करून सांगितलं मी खरंच अमिताभ बच्चन बोलतो आहे. त्यावेळी त्यांनी त्या महामार्गाची खूप प्रशंसा केली.