पाच कोटींच्या हुंड्यासाठी पत्नीला मारहाण, आयपीएस पतीवर गुन्हा दाखल

| Updated on: May 21, 2019 | 11:54 PM

लखनऊ : आयपीएस पतीने हुंड्यासाठी मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तिच्या आयपीएस पतीविरोधात तक्रारही दाखल केली आहे. मेरठच्या थाना नौचंदी या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात महिलेने पती 5 कोटी रुपयांसाठी मारहाण करतो, असा आरोप केला आहे. इतकंच नाही तर या महिलेने आयपीएस पतीचे इतर महिलांशी विवाहबाह्य संबंध […]

पाच कोटींच्या हुंड्यासाठी पत्नीला मारहाण, आयपीएस पतीवर गुन्हा दाखल
Follow us on

लखनऊ : आयपीएस पतीने हुंड्यासाठी मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तिच्या आयपीएस पतीविरोधात तक्रारही दाखल केली आहे. मेरठच्या थाना नौचंदी या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात महिलेने पती 5 कोटी रुपयांसाठी मारहाण करतो, असा आरोप केला आहे. इतकंच नाही तर या महिलेने आयपीएस पतीचे इतर महिलांशी विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप केला आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केली असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.

शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या चरणदास सिंह यांची मुलगी नम्रता हिचा आयपीएस अधिकारी अमित निगम यांच्याशी 27 नोव्हेंबर 2015 रोजी विवाह झाला. अमित निगम हे 2015 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते दिल्लीच्या पीएसमध्ये अॅडिशनल कमांडन्ट आहेत. लग्नावेळी नम्रताच्या घरच्यांनी अमितला ऑडी कार, दागिने आणि इतर अनेक वस्तू दिल्या होत्या. तरीही लग्नानंतर आयपीएस निगम यांनी पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला, असा आरोप आहे.

5 कोटी रुपयांच्या हुंड्यासाठी पती अमित मारहाण करत असल्याचा आरोप नम्रताने केला आहे. तसेच, अमितचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचंही नम्रताने तक्रारीत म्हटलं. याबाबत तिला अमितच्या लॅपटॉप आणि मोबाईलद्वारे माहिती मिळाली. नम्रता जेव्हा अमितला याबाबत विचारायची तेव्हा तो तिला मारहाण करायचा, असा आरोप नम्रताने केला. इतकी मोठी रक्कम तिचे वडील देऊ शकत नाही, हे तिने अमितला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, तरीही अमित ऐकायला तयार नव्हता, असेही नम्रताने सांगितले आहे.

दरम्यान, नम्रताच्या नातेवाईकांनी तिला तिचं घर सांभाळायचा सल्ला दिला. पतीला सोडून आपला संसार उध्वस्त करु नको. एक दिवस अमितला त्याची चूक कळेल, असे सल्ले नातेवाईकांनी दिल्याचं नम्रताने सांगितलं. मात्र, परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट होत गेली. 30 एप्रिलला अमितने पुन्हा नम्रताला मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की नम्रता बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला त्याच परिस्थितीत सोडून अमित निघून गेला. शुद्धीवर आल्यानंतर नम्रताने आपल्या एका मैत्रिणीला सारी हकिगत सांगितली. त्यानंतर नम्रताने पती अमित आणि सासु-सासऱ्यांविरोधात नौचंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

नम्रताच्या तक्रारीवरुन आरोपी आयपीएस पतीविरोधात हुंड्यासाठी छळ करणे आणि मारहाण करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नीरज सिंह यांनी दिली. आयपीएस अमित निगम यांच्यावर त्यांच्या पत्नीने अनेक गंभीर आरोप लावले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपीला अटक करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असल्यासं पोलीस अधीक्षक डॉ. अखिलेश नारायण यांनी सांगितलं.