सोनिया गांधींच्या चेहऱ्यावर जखमा असलेले पोस्टर्स इटलीच्या भिंतींवर, कारण…

| Updated on: Jan 17, 2020 | 11:29 AM

इटलीच्या मिलान शहराच्या भितींवर सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करणारे पोस्टर्स झळकत आहेत. हे पोस्टर्स जगातील सर्वात शक्तीशाली महिलांचे आहेत.

सोनिया गांधींच्या चेहऱ्यावर जखमा असलेले पोस्टर्स इटलीच्या भिंतींवर, कारण...
Follow us on

रोम : इटलीतील मिलान शहराच्या भिंतींवर सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करणारे पोस्टर्स झळकत आहेत (Injured Women Posters). हे पोस्टर्स जगातील सर्वात शक्तीशाली महिलांचे आहेत. या पोस्टर्सवर दिसणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर जखमा दाखवण्यात आल्या आहेत. या चेहऱ्यांमध्ये जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल, मिशेल ओबामा, हिलरी क्लिंटनसोबतच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचा देखील समावेश आहे (Sonia Gandhi Poster).

हे सर्व पोस्टर्स इटलीच्या स्ट्रीट आर्टिस्ट अॅलेक्सझांड्रो पालोंबोने बनवले आहेत. या सीरिजला त्यांनी ‘Just Because I am a Woman’ म्हणजेच ‘कारण मी एक स्त्री आहे’, असं नाव दिलं आहे. सोनिया गांधी, अँजेला मर्केल, म्यानमारच्या नोबल पुरस्कार विजेत्या ऑन्ग सान सू यांसारख्या शक्तीशाली महिलांच्या चेहऱ्यावर जखमा दाखवत अॅलेक्सझांड्रो पालोंबो यांनी महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे. या पोस्टर्सवर महिलांच्या जखमी चेहऱ्यांसोबत वेगवेगळे संदेशही लिहिण्यात आले आहेत.

‘मला कमी मोबदला मिळतो’

‘मला आवडणारे कपडे मी घालू शकत नाही’

‘कोणाबरोबर लग्न करावे, याचा निर्णय मी घेऊ शकत नाही’

‘माझ्यासोबत बलात्कार होतो’

जगभरात महिलांसोबत घडणाऱ्य़ा घटना या कलाकाराने त्यांच्या या पोस्टर्समधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक स्तरातून येणाऱ्या महिलेचं शोषण होतं, हा संदेश या पोस्टर्सच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असं पालोंबो यांनी सांगितलं. “महिलांविरोधात होणारे गुन्हे, आत्याचार ही एक जागतिक समस्या आहे, जी सर्वांना प्रभावित करते, मग ते कुठल्याही धर्माचे असो किंवा कुठल्याही स्तरातील असो”, असं पालोंबो यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं.

जगातील शक्तीशाली महिलांचं उदाहरण देण्यामागे जगाला जागरुक करणे, संस्था आणि राजकीय पक्षांचे याकडे लक्ष वेधणे, हा यामागील उद्देश आहे, असंही पालोंबो यांनी सांगितलं.