जागतिक अशांततेमुळे शांती यात्रेचाच मार्ग बदलला, भारत पाकिस्तान सीमा बंदी आणि इराण-अमेरिका संघर्षाचाही फटका

| Updated on: Jan 30, 2020 | 11:14 PM

देशात शांतता नांदावी या उद्देशाने दिल्लीच्या राजघाट ते जिनेवापर्यंत निघालेल्या शांती यात्रेच्या मार्गात काही देशात असलेल्या अशांतीने मोठा अडथळा आला आहे. त्यामुळे या पदयात्रेचा मार्ग बदलावा लागला (Jay Jagat Vaishwik Padyatra in Wardha).

जागतिक अशांततेमुळे शांती यात्रेचाच मार्ग बदलला, भारत पाकिस्तान सीमा बंदी आणि इराण-अमेरिका संघर्षाचाही फटका
Follow us on

वर्धा : देशात शांतता नांदावी या उद्देशाने दिल्लीच्या राजघाट ते जिनेवापर्यंत निघालेल्या शांती यात्रेच्या मार्गात काही देशात असलेल्या अशांतीने मोठा अडथळा आला आहे. त्यामुळे या पदयात्रेचा मार्ग बदलावा लागला (Jay Jagat Vaishwik Padyatra in Wardha). कलम 370 नंतर भारतात स्वागत झालं असलं, तरी पाकिस्तानसोबत असलेल्या भारताच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला. या अशांततेचा परिणाम महात्मा गांधीजींचा संदेश जगभर पोचवण्याचा संकल्प घेऊन निघालेल्या ‘जय जगत वैश्विक पदयात्रे’वरही झाला (Jay Jagat Vaishwik Padyatra in Wardha). यात सहभागी होणाऱ्यां सामाजिक कार्यकर्त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना या सर्व प्रवासाची माहिती दिली.

महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त एकता मिशनचे संस्थापक डॉक्टर राजगोपाल पी. व्ही. यांच्या नेतृत्वात पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. 2 ऑक्टोबर 2019 पासून या पदयात्रेला दिल्लीच्या राजघाटवरुन सुरुवात करण्यात आली. ही पदयात्रा 2 ऑक्टोबर 2020 रोजी जिनेवा (स्विझरलँड) येथे पोहचणार आहे. या कालावधीत ही यात्रा 10 देशांमध्ये 11000 किलोमीटरचं अंतर पायी पार करेल. या यात्रेत 10 देशांमधील 50 लोकांचा सहभाग आहे. या पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप गांधी पुण्यातिथीनिमित्त वर्ध्यातील सेवाग्राम येथे झाला. ही यात्रा देशातील 6 राज्यांचा प्रवास करुन सेवाग्रामपर्यंत आली. या प्रवासात पदयात्रेने 2025 किलोमीटरचा प्रवास केला, अशी माहिती एकता मिशनचे संस्थापक डॉ. राजगोपाल पी. व्ही. यांनी दिली.

पदयात्रेच्या माध्यमातून जागतिक शांततेसह गरीबी, हिंसा, प्रदूषण, असमानता आदी समस्यांवर महात्मा गांधीच्या दृष्टीकोनातून चर्चा केली जाणार आहे. ही यात्रा पाकिस्तानमार्गे जाणार होती. मात्रा वाघा बॉर्डर बंद केल्याने आणि दूतावासही बंद असल्याने पदयात्रेतील यात्रेकरुंना व्हिजा मिळवण्याची अडचण झाली. अखेर या तणावपूर्ण वातावरणामुळे यात्रेचा मार्ग बदलण्यात आला. विशेष म्हणजे ही यात्रा पुढे पाकिस्तानमार्गे इराणलाही जाणार होती. मात्र, तेथेही अमेरिकेसोबत सुरु असलेल्या तणावाने यात्रेत अडसर निर्माण केला. त्यामुळे यात्रेतील सर्व लोक तेथे न जाता काही लोकांचंच शिष्टमंडळ इराणला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महात्मा गांधींनी जागभरात अहिंसेचा संदेश दिला. गांधींचा हाच विचार या यात्रेच्या माध्यमातून पुन्हा जगभरात नेण्याचा संकल्प यात्रेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या संकल्पातून एक मोठा वर्ग गांधींच्या विचारांशी जोडला जाईल. तसेच जागतिक स्तरावर गांधींच्या विचाराने मार्ग काढला जाईल, अशाही आशावाद यात्रेकरुंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या यात्रेचा प्रतिसाद पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.