पत्रकार रवीश कुमार यांचा ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्काराने गौरव

| Updated on: Aug 02, 2019 | 11:13 AM

मुंबई : ‘एनडीटीव्ही इंडिया’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांना यंदाच्या ‘रेमन मॅगसेसे’ (Ramon Magsaysay Award) पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. रवीश यांच्यासह पाच जणांना यावर्षी सन्मानित करण्यात येत आहे. फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्ये येत्या नऊ सप्टेंबर रोजी ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ‘एनडीटीव्ही इंडिया’ या वाहिनीवरुन 44 वर्षीय रवीश कुमार ‘प्राईम टाईम’ शोचं […]

पत्रकार रवीश कुमार यांचा रेमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव
Follow us on

मुंबई : ‘एनडीटीव्ही इंडिया’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांना यंदाच्या ‘रेमन मॅगसेसे’ (Ramon Magsaysay Award) पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. रवीश यांच्यासह पाच जणांना यावर्षी सन्मानित करण्यात येत आहे. फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्ये येत्या नऊ सप्टेंबर रोजी ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

‘एनडीटीव्ही इंडिया’ या वाहिनीवरुन 44 वर्षीय रवीश कुमार ‘प्राईम टाईम’ शोचं सूत्रसंचालन करतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘आवाज दाबल्या गेलेल्या जनतेला आवाज उठवता यावा, यासाठी पत्रकारितेचा उपयोग केल्याबद्दल’ ‘रेमन मॅगसेसे पुरस्कार फाऊण्डेशन’ने रवीश यांची निवड केली.

रेमन मॅगसेसे फाऊण्डेशनचं सन्मानपत्र

‘उच्च गुणवत्तेच्या व्यावसायिक, नैतिक पत्रकारितेबद्दल कटिबद्धता; सत्य, सचोटी आणि स्वातंत्र्यासाठी उभं राहण्याचं नैतिक धैर्य; आवाजहीन नागरिकांना पूर्ण आणि सन्मानपूर्वक आवाज देणे, सत्तेसमोर साहसाने, मात्र सहजतेने बोलताना, लोकशाहीला पुढे नेण्याचे उदात्त कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून पूर्ण करणे’ यासाठी मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात येत आहे.

‘न्यूज अँकर म्हणून रवीश कुमार आपल्या कार्यक्रमातील सहभागींवर अधिकार गाजवत नाहीत. उलट प्रत्येकाला मत व्यक्त करण्याची संधी देतात. जहाल मतवाद्यांनी रवीश यांना त्रास देण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केला, कारण ते सर्वोच्च अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात किंवा माध्यमांवर टीका करण्यास संकोच करत नाहीत.’ असा उल्लेख ‘मॅगसेसे’तर्फे करण्यात आला आहे.

शांत आणि उत्तम माहिती संचय

रवीश कुमार हे शांत, माहितीचा उत्तम संचय असलेले आणि भारतातील अत्यंत प्रभावशाली पत्रकारांपैकी एक आहेत. स्वतंत्र आणि जबाबदार माध्यमांच्या निर्मितीसाठी गेल्या काही वर्षांत भारताला लाभलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी ते एक आहेत, असंही ‘रेमन मॅगसेसे फाऊण्डेशन’तर्फे सांगण्यात आलं आहे.

रवीश कुमार यांची पत्रकारितेतील कारकीर्द तेरा वर्षांहून अधिक कालावधीची आहे. रामनाथ गोयंका एक्सलन्स अवॉर्ड, कुलदीप नायर पत्रकारिता पुरस्कार यासारख्या नावाजलेल्या पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत गौरवण्यात आलं आहे. रवीश कुमार यांनी लिहिलेली ‘इश्क में शहर होना’, ‘द फ्री व्हॉईस : ऑन डेमोक्रसी, कल्चर अँड द नेशन’ ही पुस्तकं गाजली आहेत.

मॅगसेसेचे इतर पुरस्कारार्थी

म्यानमारचे पत्रकार को स्वी विन, थाई मानवी हक्क कार्यकर्ते अंगखाना नीलापाईजीत, दक्षिण कोरियाई कार्यकर्ते किम जोंग-की आणि फिलिपिनो संगीतकार रेमुंडो पुजांते कायाब्याब यांनाही रेमन मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.