KDMC चा कारवाईचा बडगा, ‘आम्हाला जगू द्या’, फेरीवाल्यांचं भावनिक आवाहन

| Updated on: Nov 04, 2020 | 8:30 PM

केडीएमसीच्या कारवाईला फेरीवाल्यांनी विरोध केला आहे. आमचं हातावरचं पोट आहे, आम्हाला जगू द्या, अशी भावनिक साद फेरीवाल्यांनी महानगरपालिकेला घातली आहे.

KDMC चा कारवाईचा बडगा, आम्हाला जगू द्या, फेरीवाल्यांचं भावनिक आवाहन
Follow us on

कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून 1 नोव्हेंबरपासून अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई सुरु आहे. या कारवाईला फेरीवाल्यांनी विरोध केला आहे. आमचं हातावरचं पोट आहे, आम्हाला जगू द्या, अशी भावनिक साद फेरीवाल्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घातली आहे. (KDMC Action Against Hawker)

कल्याण-डोंबिवली शहरातील फुटपाथवर असलेलं अतिक्रमण लवकरात लवकर काढा, अन्यथा कायदेशीररित्या  आम्अहीतिक्रमण काढणारच आणि दंडात्मक कारवाईदेखील करणार, असा इशारा केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दुकानदारांसह फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांना दिला होता. त्यानुसार महानगरपालिकेने 1 नोव्हेंबरपासून अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई सुरु केली आहे.

केडीएमसी प्रशासनाकडून फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरु आहे. कल्याण स्टेशन परिसरात रस्त्याच्या बाजूला फेरीवाले बसतात. आज महापालिकेचं पथक कारवाईसाठी गेले असता चार ते पाच फेरीवाल्यांनी कारवाईस विरोध केला तसंच प्रचंड गोंधळ घातला. सहा महिने आम्ही घरात होतो. आमच्याकडे रोजगार नाही. आम्हाला जगू द्या, असे भावनिक आवाहन फेरीवाल्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केले.

शहरातील मुख्य रस्ते विशेष म्हणजे डोंबिवली आणि कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालक बेशिस्तपणे रिक्षा उभी करतात. फेरीवाले फुटपाथवर बसतात. जो फूटपाथ शिल्लक राहतो त्यावर दुकानदार त्यांच्या दुकानातील साहित्य आणि बोर्ड मांडून ठेवतात. त्यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होतो. विशेष करुन महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकदा वादही झाला आहे.

फेरीवाल्यांच्या विरोधप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी पाच फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. दिवाळी सण तोंडावर असताना महापालिकेच्या कारवाईस ज्या प्रकारे विरोध सुरु झाला आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

(KDMC Action Against Hawker)

संबंधित बातम्या

अतिक्रमणधारकांवर दंडात्मक कारवाई होणार, कल्याण-डोंबिवलीतील सर्व रस्ते मोकळे करणार : केडीएमसी आयुक्त