कारभारी लयभारी ! गडहिंग्लजच्या नगराध्यक्षपदी पत्नी, उपनगराध्यक्षपदी पतीची वर्णी

| Updated on: Oct 14, 2020 | 4:24 PM

स्वाती कोरी आणि महेश कोरी या दाम्पत्याची निवड झाल्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच गडहिंग्लज नगरपालिकेचा कारभार पती-पत्नीच्या हाती आला आहे.

कारभारी लयभारी ! गडहिंग्लजच्या नगराध्यक्षपदी पत्नी, उपनगराध्यक्षपदी पतीची वर्णी
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापुरातील पती-पत्नीच्या जोडीने गडहिंग्लज नगरपालिकेवर वर्चस्व मिळवलं आहे. गडहिंग्लजच्या नगराध्यक्षपदी स्वाती कोरी विराजमान आहेत, तर आता उपनगराध्यक्षपदी त्यांचे पती महेश कोरी यांची वर्णी लागली. (Kolhapur Gadhinglaj Nagarpalika Husband Wife Nagaradhyaksha)

गडहिंग्लज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी नुकतीच महेश कोरी यांची निवड झाली. महेश कोरी हे विद्यमान नगराध्यक्षा स्वाती कोरी यांचे पती. कोरी दाम्पत्याची जोडीने निवड झाल्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच गडहिंग्लज नगरपालिकेचा कारभार पती-पत्नीच्या हाती आला आहे.

नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीची ही विशेष सभा झाली. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सावित्री पाटील यांना पाच मतं मिळाली, तर जनता पक्षाचे उमेदवार असलेले महेश कोरी 15 मतं मिळवून विजयी झाले.

गडहिंग्लज नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी या जनता दलाचे माजी आमदार अ‍ॅड श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या आहेत. तर उपनगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडलेले महेश कोरी हे शिंदेंचे जावई. गडहिंग्लज नगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या पहिल्यांदाच पती-पत्नीच्या हातात आल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

शासन-प्रशासनातील प्रसिद्ध जोड्या

नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे यजमान आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांनीही शिवसेना उमेदवाराचाच पराभव केला. शिवसेनेच्या संजय बंड यांच्या पत्नी प्रिती यांना रवी राणांनी पराभवाची धूळ चारली होती.

आस्तिक कुमार पांडे आणि मोक्षदा पाटील हे पती-पत्नी औरंगाबादमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. औरंगाबादचे महापालिका आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पांडे कार्यरत आहेत, तर पोलीस अधीक्षक म्हणून मोक्षदा पाटील कारभार पाहतात. त्याचप्रमाणे मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर हे आयएएस अधिकारी दाम्पत्य उच्चपदावर कार्यरत आहे.

संबंधित बातम्या :

कोल्हापूरचे महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली

(Kolhapur Gadhinglaj Nagarpalika Husband Wife Nagaradhyaksha)