कोरेगाव-भिमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज, समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर

| Updated on: Dec 29, 2019 | 7:39 AM

कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभावर 1 जानेवारी 2020 ला साजरा होणाऱ्या शौर्यदिना निमित्त प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे

कोरेगाव-भिमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज, समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर
Follow us on

पुणे : कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभावर 1 जानेवारी 2020 ला साजरा होणाऱ्या शौर्यदिना निमित्त प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे (Koregaon-Bhima Shaurya Din). पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, बस सेवा, सभा ठिकाण अशा सर्व सुखसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली (Koregaon Bhima 1st January).

मागील दोन वर्षांपासुन जिल्हा प्रशासनाकडून कोरेगाव भिमा येथे येणाऱ्या भाविकांना सर्व सुखसुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवसेंदिवस भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागू नये आणि भाविकांना सर्व सुखसुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

यावर्षी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन 16 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगपासून विजयस्तंभ आणि वढु येथे जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याकाळात समाजकंटकांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे. यासंबंधी परिसरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून तशी नोटीस देण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विजयस्तंभावर शौर्यदिवस साजरा होत असताना मागील काळात काही त्रूटी राहून गेल्या होत्या. त्यामुळे काही प्रमाणात गैरसोय झाली होती. यावेळी प्रशासनाकडून कुठलीही त्रूटी रहाणार नसून याठिकाणी येणाऱ्या भाविकांना योग्य त्या सर्व सुखसुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शौर्यदिन साजरा होत असताना सोशल मिडीयावर पोलिसांची करडी नजर रहाणार आहे. यावेळी आक्षेपार्ह पोस्ट, भडकावू भाषण, किंवा तेढ निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण राबविण्यात येणार असल्याचंही पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं.