एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार, लवकरच पेट्रोल-डिझेलची विक्री

| Updated on: Aug 18, 2020 | 10:01 PM

प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. (MSRTC Indian Oil contract start petrol diesel sell) 

एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार, लवकरच पेट्रोल-डिझेलची विक्री
Follow us on

मुंबई : एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेल पंप सुरु करणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. (MSRTC Indian Oil contract start petrol diesel sell)

आज सह्याद्री येथे परिवहन मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ आणि इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर 30 ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप सुरु केले जातील. तर 5 ठिकाणी एल.एन.जी.पंप (liquified Natural Gas) सुरु करण्यात येणार आहे. हा पेट्रोल-डिझेलपंप/ एल.एन.जी.पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार आहे. तर त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणाऱ्या हजारो कोटीच्या उत्पन्नाला एसटीला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने मालवाहतुकीसारख्या उपक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तसेच टायर पुनर्स्थिरीकरण प्रकल्पातून देखील व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक उत्पन्न स्त्रोतांबरोबरच राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मोकळ्या जागेवर इंडियन ऑईलच्या सहकार्याने सर्वसामांन्यांसाठी पेट्रोल-डिझेल/एल.एन.जी. पंप उभारले जाणार आहेत.

या विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण होणार आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. (MSRTC Indian Oil contract start petrol diesel sell)

संबंधित बातम्या :

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची अचानक बदली, डॉ. संजय मुखर्जी यांची वर्णी

पंचगंगेने पुन्हा इशारा पातळी ओलांडली, कोल्हापुरात धाकधूक, तर सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर