Mukesh Sahni | बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव, तरीही मंत्रिपदाची लॉटरी लागलेला ‘व्हीआयपी’ नेता

| Updated on: Nov 16, 2020 | 5:13 PM

नितीश कुमार यांच्यासोबत पाटण्यातील राजभवनात मुकेश साहनींनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

Mukesh Sahni | बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव, तरीही मंत्रिपदाची लॉटरी लागलेला व्हीआयपी नेता
Follow us on

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी पडूनही विकासशील इन्सान पक्षाचे (Vikassheel Insaan Party) अध्यक्ष मुकेश साहनी (Mukesh Sahani) यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. साहनी हे नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या मंत्रिमंडळात ‘व्हीआयपी’ पक्षातून स्थान मिळवणारे एकमेव व्यक्ती ठरले आहेत. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबत पाटण्यातील राजभवनात मुकेश साहनींनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. (Mukesh Sahani takes oath in Nitish Kumar cabinet ministry)

“मी माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात सामील होत आहे. हा सर्व व्हीआयपी कार्यकर्ते आणि बिहारच्या जनतेचा विजय आहे” असं मुकेश साहनी यांनी ट्विटरवर लिहिले आहे. “आम्हाला मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार आणि गृहमंत्री अमित शाह, तसेच एनडीएच्या सर्व नेत्यांचे आभार.” असेही साहनी यांनी म्हटले आहे.

व्हीआयपीचे अध्यक्ष मुकेश साहनी यांनी यावेळी प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी बिहारमधील सिमरी बख्तियारपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या दोन हजारांच्या मताधिक्याने राजद उमेदवार विजयी झाला.

बिहारमध्ये सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या एनडीएमध्ये भाजप आणि जेडीयू यांच्यासोबत हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) हे दोन पक्षही आहेत. चार मित्रपक्षांमध्ये मंत्रिपदांच्या वाटणीसाठी सूत्र निश्चित झाले आहे. साडेतीन आमदारांमागे एक मंत्रिपद या फॉर्म्युलाने चारही पक्षांचे चेहरे मंत्रिमंडळात असतील.

मुकेश साहनी यांचा प्रवास

मुकेश साहनी यांनी बॉलिवूडमध्ये स्टेज डिझायनर म्हणून कामाला सुरुवात केली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी साहनी यांनी भाजपसाठी प्रचार केला होता. मात्र भाजपने अनुसूचित जमातीच्या जनतेला दिलेलं आश्वासन न पाळल्याचा दावा करत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. साहनी यांची ‘सन ऑफ मल्लाह’ अशी स्थानिक राजकारणात ओळख आहे. (Mukesh Sahani takes oath in Nitish Kumar cabinet ministry)

मुकेश साहनी यांनी 2018 मध्ये विकसनशील इन्सान पक्षाची स्थापना केली. काँग्रेस-राजदच्या महागठबंधनमध्ये सहभागी होत व्हीआयपी पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुका लढवल्या, मात्र त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यानंतर एनडीएच्या गोटात सामील होत त्यांनी 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुका लढवल्या. त्यांना अकरापैकी चार जागा जिंकण्यात यश आले. मात्र आता विजयी चार आमदारांऐवजी पक्षाध्यक्षांनीच मंत्रिपद मिळवले आहे.

जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाटण्यातील राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीशकुमारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यांच्यासोबत तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जेडीयूचे 6, भाजपचे 5, तर ‘हम’ आणि व्हीआयपी पक्षाकडून एक-एका नेत्याने मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस हे पाटण्यात दाखल झाले.

एनडीएला विधानसभा निवडणुकीत 125 जागा मिळाल्या असून भाजपला सर्वाधिक म्हणजे 74 जागा आहेत. त्यापाठोपाठ जेडीयूला 43, तर हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी यांना प्रत्येकी चार-चार जागा आहेत.

संबंधित बातम्या :

बिहारमध्ये पुन्हा नितीश’राज’!; नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

बिहारनंतर पुढच्यावर्षी पाच राज्यांमध्ये निवडणूक, भाजपपुढे ‘या’ दोन राज्यांमध्ये कडवं आव्हान

(Mukesh Sahani takes oath in Nitish Kumar cabinet ministry)