कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानीचं नागपुरात आंदोलन, तुपकरांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Nov 11, 2020 | 10:57 AM

मोर्चाला सुरुवात होताच पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह स्वाभिमानीच्या 20 ते 30 कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतलं.

कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानीचं नागपुरात आंदोलन, तुपकरांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Follow us on

नागपूर : केंद्र सरकारने कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज नागपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana Protest) आंदोलन पुकारलं होतं. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात स्वाभिमानीचे कार्यकर्ते हे आंदोलन करत होतं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतला होता. मात्र, मोर्चाला सुरुवात होताच पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह स्वाभिमानीच्या 20 ते 30 कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली (Swabhimani Shetkari Sanghatana Protest).

स्वाभिमानीचा मोर्चा संविधान चौकातून गडकरींच्या घराच्या दिशेने निघाला होता. यावेळी स्वाभिमानीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. संविधान चौकात दिवाळी साजरी करुन स्वाभिमानीचे कार्यकर्ते नितीन गडकरींच्या घराच्या दिशेने निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवत रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, हे सरकार पोलिसांना समोर करत असल्याची टीका यावेळी रविकांत तुपकर यांनी केला. यावेळी “सरकार हमसे डरती हैं, पुलिस को आगे करती हैं”, अशा घोषणाही देण्यात आल्या.

“पोलिसांनी सरकारच्या इशाऱ्यावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही त्यांना विनंती करत होतो की लोकशाही मार्गाने आम्ही गडकरींच्या घराबाहेर चाललो आहे. तरी पोलिसांनी जोरबरदस्ती करत, हातापायी करत, अमानवीय पद्धतीने कारवाई करत कार्यकर्त्यांना अटक केली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. हे पोलीस प्रशासनाला आणि सरकारला शोभत नाही. लोकशाही पद्धतीने आम्ही सांगून आंदोलन करत असू तर हे आंदोलन दडपायला नको. आम्हाला शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने देखील आंदोलन करता येतं. आज महात्मा गांधींच्या मार्गाने आलो उद्या भगत सिंहांच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी सरकारला दिला.

“बिहारमध्ये निवडणुका होत आहेत तिथे कोरोना नाही आणि आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो तेव्हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारला आम्ही दाद मागणार, यांना यांची जागा दाखवून देऊ”, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

कृषी कायद्याविरोधात केंद्रीय मंत्र्यांसमोर दिवाळी साजरी करत स्वाभिमानीचं आंदोलन

शेतकऱ्यांना किमान हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, त्यासाठी केंद्र सरकारने भरीव पॅकेज द्यावे. हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी तालुकानिहाय CCI चे कापूस खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरु करावे. सोयाबीनचा प्रति क्विटंल किमान 6000 रुपये भाव स्थिर करण्यासाठी धोरण आखावे. पिकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी केंद्र सरकारने बाध्य करावे. केंद्राने आणलेले कृषी विधेयके रद्द करावे, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आजपासून दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची सुरुवात नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करुन करण्यात येणार होतं.

Swabhimani Shetkari Sanghatana Protest

संबंधित बातम्या :

राज्यघटनेनुसार कृषीविषयक कायदे करण्याचा अधिकार केंद्राला नाही; काँग्रेसचा दावा

सातवा वेतन आयोग लागू करा; चारही कृषी विद्यापीठातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांकडून कौतुक