मुलगा झाल्याच्या आनंदात गावभर पेढे, पित्याला कोरोना, 116 जण क्वारंटाईन

| Updated on: Jul 09, 2020 | 2:54 PM

मुलगा झाल्याच्या आनंदात नांदेडमधील 24 वर्षीय तरुणाने गावात पेढे वाटले. मात्र त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे

मुलगा झाल्याच्या आनंदात गावभर पेढे, पित्याला कोरोना, 116 जण क्वारंटाईन
Follow us on

नांदेड : मुलाच्या जन्माचा उत्सव साजरा करणाऱ्या नांदेडमधील पित्याच्या आनंदावर अवघ्या काही दिवसात विरजण पडलं. पित्याला कोरोनाची लागण झाली, तर त्याने वाटलेले पेढे खाणाऱ्या तब्बल 116 जणांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे. (Nanded Man distributes Sweets after Son Birth Tested Corona Positive)

मुलगा झाल्याच्या आनंदात 24 वर्षीय तरुणाने गावात पेढे वाटले. मात्र त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने पेढे खाणाऱ्या 116 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील काटकळंबा गावात ही घटना घडली. तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने गावाची अक्षरशः झोप उडाली आहे.

प्रशासकीय यंत्रणेने आता खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील केला आहे. गावात आरोग्य कर्मचारी पथक, पोलीस, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यासह सामाजिक टीमचा राबता वाढला आहे.

नेमकं काय झालं?

संबंधित 24 वर्षीय तरुण औरंगाबाद येथील कंपनीत काम करतो. 4 जुलै रोजी मुलगा झाला म्हणून पाहण्यासाठी तो नांदेडमधील कंधार तालुक्यातील गावाकडे आला. आपल्या मुलाला पातंरड येथे भेटला आणि गावाकडे परतला. त्याच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ बहीण आहेत. दोन दिवसात तो गावातच आजोळी मामा-मामीलाही भेटला. मुलगा झाल्याच्या आनंदात त्याने गावात, मित्र मंडळीत पेढे वाटले.

हेही वाचा : वर्ध्यात नवरदेवाला कोरोना, वऱ्हाडी अमरावतीला परतले, क्वारंटाईनसाठी प्रशासनाची वरात

त्याच्या संपर्कात आतापर्यंत 116 जण आले असून त्या सर्वांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केलं आहे. न्हाव्याकडे संपर्क झाल्यामुळे नऊ जणांना कंधार येथे स्वॅबसाठी पाठवण्यात आलं आहे. रुग्णाच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचं काम तातडीने चालू केलं आहे. गावात भीतीचं वातावरण पसरु नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

दरम्यान, काल (बुधवार 8 जुलै) दिवसभरात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 511 इतकी झाली आहे. उपचारादरम्यान 23 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत 341 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 147 बाधित रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

नांदेड शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता 10 दिवसाचा लॉकडाऊन करावा, अशी मागणी महापौर दीक्षा धबाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील रुग्णसंख्या 500 च्या वर गेल्याने 15 ते 25 जुलै दरम्यान शहरात लॉकडाऊन करावा अशी मागणी महापौरांनी केली आहे.