डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता; छगन भुजबळांचे सतर्क राहण्याचे आवाहन

| Updated on: Nov 22, 2020 | 5:19 PM

डिसेंबरच्या अंतीम टप्प्यात फेरआढावा घेतल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेवून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता; छगन भुजबळांचे सतर्क राहण्याचे आवाहन
Chhagan Bhujbal
Follow us on

नाशिक : जगभरात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. देशात, राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात (Chhagan Bhujbal On Corona Second Wave) होण्याची चाहुल लागली असून नाशिक जिल्ह्यातही 19 नोव्हेंबरपासून रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्यापासून शाळा सुरु करण्याचा निर्णय 4 जानेवारी 2021 पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. डिसेंबरच्या अंतीम टप्प्यात फेरआढावा घेतल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेवून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ते आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबतच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना बोलत होते (Chhagan Bhujbal On Corona Second Wave).

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे शहर पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मनोज घोडे-पाटील, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रेखा रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील पवार, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर, आदि उपस्थित होते.

“जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना, वृत्तपत्रांचे संपादक यांच्याशी माझी पालकमंत्री या नात्याने साधक-बाधक चर्चा झाली आहे. या चर्चेतूनच जोखीमेची शक्यता पाहता शाळा सुरु न करता तूर्तास संस्थगित ठेवणे योग्य राहिल असा सूर सर्वांचा दिसून आला. जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनीही डिसेंबर जानेवारी हे महिने बालकांसाठी विविध आजारांनी अतिजोखिमेचे असतात त्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे असलेली बालरोगतज्ञांची उपलब्धता, बालरुग्णालये त्यांची कोव्हिड-19 च्या अनुषंगाने असलेली क्षमता, लागणारे संभाव्य मनुष्यबळ, असलेली आणि लागणारी वैद्यकीय साधनसामुग्री यांचाही अंदाज घेणे गरजेचे आहे”, असं पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

“आजपर्यंत आपण सर्वसाधारण रुग्णांसाठीच्या कोरोना संसर्गाची लक्षणे आणि गुणधर्म यावर आधारित आपली आरोग्य सेवाविषयक क्षमतावृद्धी केली आहे. बालकांच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या लाटेची गुणधर्म आणि शक्यतांच्या अनुषंगाने आपण आपल्या क्षमतांची चाचपणी करुनच शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा असे वाटते”, असंही ते म्हणाले (Chhagan Bhujbal On Corona Second Wave).

शहरी भागातील पालकांमध्ये शाळा सुरु करणेबाबत फारशी अनुकुलता दिसून येत नाही. तर ग्रामीण भागात 50 टक्के लोकांमध्ये ती अनुकुलता दिसून येते. अशाही परिस्थितीत उद्यापासून शाळा सुरु केल्याच तर, सुट्ट्या वगळता 18 दिवस शाळा सुरु राहतील. त्यात अर्धे विद्यार्थी 9 दिवस आणि उरलेले अर्धे 9 दिवस शाळेत येतील या पार्श्वभूमीवर केवळ 9 दिवसांसाठी शाळा सुरु करण्याची जोखीम का घ्यायची याबाबत चर्चा करताना आपण आस्ते कदम पुढे जाण्याचा विचार करत आहोत, असेही यावेळी भुजबळ म्हणाले.

जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. नाशिक जिल्ह्यातही 19 तारखेपासून रुग्णवाढ सुरु झालेली आहे. याचा संबंध दिवाळी बरोबर आहे, की जगभरात आलेल्या दुसऱ्या लाटेशी आहे. याबाबत तज्ञ सांगतील. मात्र, हळूहळू कमी होत असलेली संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण नक्कीच आहे. डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटी नाताळच्या सुट्टी संपल्यावर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे 4 जानेवारीपर्यंत शाळा बंदचा निर्णय कायम राहील, असेही यावेळी भुजबळ यांनी सांगितले.

पेशंट वाढले तर आहे ते कोव्हिड सेंटर सूरु राहतील आणि गरज पडल्यास आणखीन सेंटर सुरु करण्याबाबत तयारी सुरु आहे, असे भुजबळ म्हणाले. जिल्ह्यातील सुमारे 40 शिक्षक तपासणीतून कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून अद्याप काही अहवाल येणे बाकी आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे शहर पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मनोज घोडे-पाटील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रेखा रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील पवार, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर, यांनी चर्चेत सहभाग घेवून आपापल्या विभागाशी संबंधित माहिती सादर केली.

Chhagan Bhujbal On Corona Second Wave

संबंधित बातम्या :

नाशिकमधील शाळा सुरु की निर्णय पुढे ढकलावा, उद्या तातडीची बैठक : छगन भुजबळ

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी गावकऱ्यांचा मोठा निर्णय, वसईतील कळबं बीचवर लॉकडाऊन

दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला, पुण्यातील गर्दीवर अजित पवारांचा खोचक टोला