बूथ कार्यकर्त्यांना प्रोटीन द्या, पण हगवण लागेल एवढं नको : नितीन गडकरी

| Updated on: Jul 06, 2019 | 4:25 PM

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याबाबत मिश्किल वक्तव्य केलं आहे.

बूथ कार्यकर्त्यांना प्रोटीन द्या, पण हगवण लागेल एवढं नको : नितीन गडकरी
Follow us on

नागपूर: केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याबाबत मिश्किल वक्तव्य केलं आहे. कमी मते मिळाले तेथील बूथ कार्यकर्त्यांना प्रोटीन द्या, पण हगवण लागेल एवढं प्रोटीन देऊ नका, असा सल्ला गडकरींनी दिला.

यावेळी गडकरींनी नेत्यांच्या आयुष्यातील कार्यकर्त्यांचं महत्त्वही सांगितलं. तसेच नेत्यांनी कार्यकर्त्यांवर कशाप्रकारे प्रेम करावं, याविषयी देखील गडकरींनी भाष्य केलं. गडकरी म्हणाले, “अनेकदा कार्यकर्त्यांवर पुत्रवत प्रेम करा असं सांगितलं जातं. मात्र, पुत्रवत नाही, पण किमान परिवारासारखं तरी प्रेम करा. कमी मतं मिळाले तेथील बूथ कार्यकर्त्यांना प्रोटीन द्या, पण हगवण लागेल एवढे प्रोटीन देऊ नका.”

“साला मै तो साहब बन गया, रुप मेरा देखो”

गडकरींनी नेत्यांच्या जीवनात कार्यकर्ते किती महत्त्वाचे असतात हे कार्यकर्त्यांना समजावून सांगताना सध्याच्या राजकीय नेत्यांच्या वर्तनावरही उपहासात्मक निशाणा साधला. ते म्हणाले, “आजकाल काही नेते ‘साला मै तो साहब बन गया, रुप मेरा देखो’ अशा अविर्भावात असतात.”

राजकारणात परिवारवादाचा मी विरोधक, पण

भाजपचे नेते प्रविण दटके यांना दिलेल्या संधीच्या निमित्ताने भाजपमधील घराणेशाहीचाही प्रश्न विचारण्यात येत आहे. यावर नितीन गडकरी म्हणाले, “मी राजकारणात परिवारवादाचा विरोध करतो. मात्र, कामाच्या बळावर कुणाला तिकीट मिळाले तर ते चुकीचं नाही. नागपूर भाजप अध्यक्ष प्रविण दटके यांना अशीच कामाच्या बळावर संधी मिळाली आहे.”

गडकरी यांनी यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना अधिक मेहनत घेण्याचाही सल्ला दिला. काँग्रेसला मतं देणाऱ्यांनी त्यांची मतं भाजपला का दिली नाही, याचा विचार करा. तसेच काँग्रेसला मतं देणारांची मतं जिंका, असा सल्ला गडकरींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.