दुष्काळग्रस्त उस्मानाबादेत डान्सबारची छमछम, पोलिसांचंही अभय

| Updated on: Aug 15, 2019 | 10:26 PM

दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील सौदागर हॉटेलमध्ये आर्केस्ट्राच्या नावाखाली खुलेआम डान्सबारची छमछम सुरू असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.

दुष्काळग्रस्त उस्मानाबादेत डान्सबारची छमछम, पोलिसांचंही अभय
Follow us on

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील सौदागर हॉटेलमध्ये आर्केस्ट्राच्या नावाखाली खुलेआम डान्सबारची (osmanabad Dance bar) छमछम सुरू असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या डान्सबारमध्ये बारबालांवर पैशाचा पाऊस पडत असल्याचे व्हिडिओ (Dance Bar Video) सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणानंतर हा डान्सबार बंद करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. मात्र या डान्सबारवर कारवाई न करता स्थानिक पोलीस याला अभय देत असल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा परिसरात सौदागर नावाचे एक हॉटेल आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टच्या निमित्ताने ड्राय डे असतानाही काल मध्यरात्री हा डान्सबार सुरु होता. यावेळी बारबालांवर डान्सदरम्यान पैसे उधळत असतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच यावेळी डान्सबारमध्ये तुफान हाणामारीही झाली.

बारबालेवर पैसे का उधळले नाहीत? असे म्हणत बार चालक विजय गायकवाड, भालचंद्र काळे, विकास मानेसह इतर जणांनी राजेंद्र जाधव यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र जाधव जखमी झालेत. त्यांनी ही सर्व व्यथा सोशल मीडियाच्या माध्यामातून लोकांच्या समोर व्यक्त केली. या प्रकरणानंतर उमरगा पोलीस स्टेशनमध्ये 323 कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ही हाणामारी डान्सबारमुळे झाल्याचे उघडकीस आले असतानाही पोलीस मात्र डान्सबारचा उल्लेख टाळत आहेत. तसेच आजूबाजूच्या वस्तीत राहणाऱ्या लोकांनी हा बार बंद करावी अशी मागणी केली आहे. मात्र या डान्सबारला स्थानिक पोलीस अभय देत असल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे.