पंकजा मुंडेंची उपोषणाची हाक, फडणवीस, चंद्रकांत पाटीलही सहभागी होणार

| Updated on: Jan 27, 2020 | 8:11 AM

जलसंधारण, पाण्याचे संवर्धन, पिण्याचे पाणी या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत.

पंकजा मुंडेंची उपोषणाची हाक, फडणवीस, चंद्रकांत पाटीलही सहभागी होणार
Follow us on

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी उपोषणाची हाक दिली आहे. औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे आज (सोमवार 27 जानेवारी) लाक्षणिक उपोषण (Pankaja Munde Aurangabad Protest) करणार आहेत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे नेतेही उपोषणात सहभागी होणार आहेत.

मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या योजनेची अंमलबजावणी करणे, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन, पिण्याचे पाणी या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात सकाळी 10 वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठवाडा पाणी प्रश्नी आंदोलन छेडण्याचे संकेत दिले होते.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी लढा उभारणाऱ्या पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादला येण्याचं आवाहन भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. प्रीतम मुंडेंनी गेल्या आठवड्यात फेसबुक पोस्ट लिहून कार्यकर्त्यांना साद घातली होती.

पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे, पाण्याचे संवर्धन अशा अनेक शाश्वत स्वरुपाच्या उपाय योजना मराठवाड्यात यशस्वीपणे राबवल्या आहेत, असं प्रीतम मुंडेंनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्यामुळे मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Pankaja Munde Aurangabad Protest)