नाशकात पोलिसाचा सावत्र मुलांवर गोळीबार, दोन्ही मुलांचा मृत्यू

| Updated on: Jun 21, 2019 | 8:46 PM

घरगुती वादातून पोलिसानेच सावत्र मुलांवर गोळीबार केल्याची घटना नाशकात घडली. या गोळीबारात या पोलिसाच्या दोन्ही सावत्र मुलांचा मृत्यू झाला आहे.

नाशकात पोलिसाचा सावत्र मुलांवर गोळीबार, दोन्ही मुलांचा मृत्यू
Follow us on

नाशिक : घरगुती वादातून पोलिसानेच सावत्र मुलांवर गोळीबार केल्याची घटना नाशकात घडली. या गोळीबारात या पोलिसाच्या दोन्ही सावत्र मुलांचा मृत्यू झाला आहे. संजय भोये असं या पोलिसाचं नाव आहे. ते नाशकात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. प्रॉपर्टीच्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संजय भोये  हे नाशिकच्या पेठरोडवरील अश्वमेध नगर येथील राजमंदिर इमारतीत राहतात. ते उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. संजय भोये आणि त्यांची दोन सावत्र मुलं शुक्रवारी (21 जून) घरात बसलेली होती. त्यानंतर या बाप लेकांमध्ये अचानक कुठल्याहीतरी कारणावरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संजय भोये यांनी रागाच्या भरात त्यांची सर्व्हिस रिव्हॉलवर काढली. संजय भोये यांना रिव्हॉलवर काढताना बघून मुलांनी जीव वाचवण्यासाठी बाधरुमच्या दिशेने धाव घेतली. मात्र, ते संजय भोये यांच्या निशाण्यापासून वाचू शकले नाहीत. संजय भोये यांनी मुलांच्या दिशेने चार राऊंड फायर केले. या गोळीबारात संजय भोये यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.

सोनू नंदकिशोर चिखलकर (वय 25) आणि शुभम नंदकिशोर चिखलकर (वय 22) असं या दोन सावत्र मुलांची नावं आहेत. सोनू चिखलकर हा नौदलात कार्यरत होता. तर शुभम हा नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला होता.

या प्रकरणी पोलिसांनी संजय भोये यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पाहा व्हिडीओ :