नराधम शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, पीडितेची प्रकृती गंभीर

| Updated on: Jan 20, 2020 | 11:23 PM

शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बिलोलीमधील शंकरनगरमधील साईबाबा शाळेत ही शिक्षकी पेशाला नात्याला काळीमा फासणारी घटना घडली.

नराधम शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, पीडितेची प्रकृती गंभीर
Follow us on

नांदेड : शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे (Rape On Minor Student). बिलोलीमधील शंकरनगरमधील साईबाबा शाळेत ही शिक्षकी पेशाला नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. अल्पवयीन मुलगी ही सहावीत शिकत असून दोन नराधम शिक्षकांनी तिच्यावर अत्याचार केले. सध्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे ही घटना महिन्याभरापूर्वी घडली (Rape On Minor Student). मात्र, या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम 376 आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अशोक चव्हाणांकडून पीडितेची भेट

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज सोमवारी पीडित मुलीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. चव्हाण यांनी तिच्या कुटुंबाचीही भेट घेतली. पीडितेच्या उपचाराची माहिती घेऊन तिला योग्य सुविधा आणि उपचार करण्याच्या सूचना चव्हाण यांनी रुग्णालय प्रशासनाला केल्या. दरम्यान, सरकारच्या वतीने सर्व प्रकारची मदत पीडितेला देण्यात येईल, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

नेमकं प्रकरण काय?

सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शाळेतील दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकी आली. ही घटना नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. विशेष म्हणजे घटनेला महिना उलटला, आता पिडीत मुलीची प्रकृती बिघडल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

शंकरनगर येथील साईबाबा शाळेत ही मुलगी शिकत आहे. एका महिन्यांपूर्वी आरोपी शिक्षक रसूल सय्यद आणि दयानंद राजुळे यांनी मुलीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ दाखवतो म्हणून शाळेतील एका खोलीत नेले. मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर दोघांनीही लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणाची तक्रार पीडितेच्या आईने शाळा प्रशासनाकडे केली. पण विधवा असलेल्या मातेवर दबाव टाकून तिला परत पाठवण्यात आले. यानंतर बदनामीच्या भीतीने आई गप्प बसली. पण काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती बिघडली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनानी आवाज उठवला आणि त्यानंतर रामतीर्थ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती लपवणाऱ्या प्राचार्य, मुख्याध्यापक आणि अन्य एका महिलेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. पडित मुलीची प्रकृती गंभीर असून ती मानसिक धक्क्यात आहे. दरम्यान, शाळा एका बड्या राजकीय नेत्याची असल्याने पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

शंकरनगरमध्ये बंद

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शंकरनगरमध्ये सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील सर्व दुकाने आणि व्यवहार दिवसभर ठप्प होते. दरम्यान, यातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. तसेच, रस्त्यावर टायर जाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेमुळे शंकरनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.