शेंडीने गाडी ओढून नवस फेडण्याची प्रथा, काळामाथा येथे लाखो भाविक दाखल

| Updated on: Feb 09, 2020 | 6:10 PM

काळामाथा येथील संत अवलिया महाराज यांच्या यात्रा महोत्सवात शेंडीने गाडी ओढून नवस फेडण्याची प्रथा आहे.

शेंडीने गाडी ओढून नवस फेडण्याची प्रथा, काळामाथा येथे लाखो भाविक दाखल
Follow us on

वाशिम : जिल्ह्यातील काळामाथा येथील संत अवलिया महाराज यांच्या 132 व्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे (Kalamatha Yatra Washim). अवलीया महाराज यांच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी शेंडीने गाडी ओढून नवस फेडण्याची प्रथा आहे. हा नवस फडेण्यासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविक भक्त या यात्रेत दाखल झाले आहेत. हे देवस्थान नवसाला पावणारं असल्याचीही आख्यायिका आहे.

मालेगाव तालुक्यातील काळामाथा येथे पुरातन काळात अवलिया महाराज प्रकट झाल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर त्यांनी शेजारच्या गावातील दत्तू पाटील यांच्या स्वप्नात जाऊन यात्रा महोत्सवाची कल्पना दिली. तेव्हापासून येथे ही यात्रा सुरु झाली असल्याचं भाविक सांगतात.

वाशिम जिल्ह्यातील काळामाथा येथील अवलिया महाराज देवस्थानाची यात्रा पंचक्रोशीत चांगलीच प्रसिद्ध आहे. या यात्रा महोत्सवादरम्यान 101 क्विंटल शिऱ्याचा प्रसाद वाटपही करण्यात येतो. भाविक येथे नवस बोलतात आणि नंतर यात्रा महोत्सवात शेंडीने गाडा ओढून नवस फेडतात. भाविक पुरणपोळीचा नैवेद्य अवलिया चरणी अर्पण करतात. शेकडो वर्षांपासून जनत केलेली ही गाडी ओढून नवस फेडण्याची परंपरा अजूनही कायम आहे.

बंजारा समाज बांधवांसाठी ही यात्रा महत्वाची असून आम्ही आधी नवस बोलतो आणि आमचं मागणं पूर्ण झालं की गाडी ओढून पूर्ण करत असल्याचं भाविक सांगतात. दिवसेंदिवस विज्ञान प्रगती करत असल्याचं चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यात मात्र, अवलिया महाराजांवरील श्रद्धेपोटी लोक शेंडीने गाडी ओढण्याचा प्रकारही करत आहेत.