पोलिसांपासून वाचण्यासाठी चोरांची वाहत्या नदीत उडी

| Updated on: Jul 14, 2019 | 6:33 PM

महाडमध्ये घरफोड्या करणाऱ्या चोरांनी पोलीस पकडतील या भितीने चक्क नदीत उडी मारली. हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये कैद झाला आहे. दरम्यान नदीत उडी मारलेल्या या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पोलिसांपासून वाचण्यासाठी चोरांची वाहत्या नदीत उडी
Follow us on

महाड : एखाद्या चोराला पकडण्यासाठी पोलीस आटोकात प्रयत्न करतात. मात्र हेच चोर पोलिसांपासून वाचण्यासाठी एखाद्या घराआड किंवा झाडामागे लपतात असे दृश्य आपण अनेकदा चित्रपट किंवा मालिकांमध्ये पाहिले असेल. असेच एखाद्या चित्रपटाप्रमाणे दृश्य काल (13 जुलै) खेडमध्ये पाहायला मिळाले. महाडमध्ये घरफोड्या करणाऱ्या चोरांनी पोलीस पकडतील या भितीने चक्क नदीत उडी मारली. हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये कैद झाला आहे. दरम्यान नदीत उडी मारलेल्या या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. दिनेश धनसिंग अलावा, जितेन भालसिंग मनलोई अशी पोलिसांनी पकडलेल्या दोन चोरांची नावे आहेत.

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये घरफोडीची घटना घडली. घरफोडी करणारे हे चोर खेड कशेडीच्या बाजून गेल्याचा मेसेज पोलिसांना समजला. त्यानुसार त्यांनी खेड पोलिस ठाणे हद्दीत कशेडी घाट ते भरणे नाका या ठिकाणी नाकाबंदी लावली. पोलिसांनी पाहिल्यानंतर त्या चोराने खेड खवटी रेल्वे स्टेशनवरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र समोर पोलीस पाहिल्यावर त्या दोन्ही चोरांनी चक्क नदीत उडी मारली.

दिनेश धनसिंग अलावा, जितेन भालसिंग मनलोई अशी पोलिसांनी पकडलेल्या दोन चोरांची नावे आहेत. हे दोघेही मूळ मध्यप्रदेशातील आहेत. नदीत उडी मारल्यानंतर पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करुन त्यांना अटक केली.

यानंतर त्यांच्याकडून LAVA कंपनीचा मोबाईल, परदेशी नाणी, भारतीय नाणी, रोख रक्कम, नकली दागिने, 6 मोबाईल सिम कार्ड, दोन साधे मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच घरफोडीसाठी अडजस्ट पाना , स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी कटावणी या वस्तूही त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत. दरम्यान खेड पोलिसांच्या मदतीने या चोरांना पकडण्यात आलं असून त्यांना रायगड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.