Sangli Flood : सांगलीतील जुनी धामनीकडे प्रशासनाचं अद्यापही दुर्लक्ष, छातीभर पाण्यात गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

| Updated on: Aug 12, 2019 | 8:23 AM

सांगली-सातारा-कोल्हापुरात महापुराने थैमान घातलं आहे. या भागांमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. मात्र, अद्यापही अशी काही गावं आहेत ज्यांच्यापर्यंत शासनाची मदत पोहोचू शकलेली नाही. असंच एक गाव म्हणजे जुनी धामनी परिसर. नऊ दिवस उलटूनही अद्यापही हे संपूर्ण गाव पाण्याखाली आहे.

Sangli Flood : सांगलीतील जुनी धामनीकडे प्रशासनाचं अद्यापही दुर्लक्ष, छातीभर पाण्यात गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास
Follow us on

सांगली : सांगली-सातारा-कोल्हापुरात महापुराने थैमान घातलं आहे. या भागांमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. मात्र, अद्यापही अशी काही गावं आहेत ज्यांच्यापर्यंत शासनाची मदत पोहोचू शकलेली नाही. असंच एक गाव म्हणजे जुनी धामनी परिसर. नऊ दिवस उलटूनही अद्यापही हे संपूर्ण गाव पाण्याखाली आहे. या भागातील घरं, मंदिरं, दरगाह येथे छातीपर्यंत पाणी भरलेलं आहे. जिल्ह्यातील काही भागात पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली, तरी जुनी धामनी परिसर त्याला अपवाद ठरला आहे. येथे अद्यापही परिस्थिती जैसे थेच आहे. घरांमध्ये, गावात पाणी भरलेलं असलं, तरी आपल्या घराकडे जाण्याची ओढ आता गावकऱ्यांना सतावू लागली आहे.

जुनी धामनी हे गाव कृष्णा नदीच्या काठावर आहे. कृष्णा नदीचं पात्र अफाट आहे. त्यामुळे पुराचा मोठा फटका या गावाला बसला. गावकऱ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी गाव सोडले खरे, पण आता त्यांना घराची ओढ लागली आहे. त्यातच गावातील जनावरं ही अद्यापही गावातच अडकून आहे. त्यांना बाहेर काढायला कुणी नाही, चारा द्यायला कुणी नाही. त्यामुळे या महाप्रलयात या जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. तरी गावकरी आपल्या जीवाची पर्वा न करता बोटीतून प्रवास करत गावात जाऊन जनावरांना चारा देत आहेत. गावकरी रोज हा जीवघेणा प्रवास करत आहेत, मात्र, प्रशासन अद्यापही या ग्रामस्थांच्या मदतीला पोहोचू शकलेलं नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सरकारबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. नऊ दिवस ऊलटूनही गावाकडे प्रशासनाचा कुणीही अधिकारी, मंत्री फिरकले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गेल्या नऊ दिवसांपासून सांगली-सातारा-कोल्हापुरात महापुराने हाहा:कार माजवला आहे. 2005 ला आलेल्या पुरापेक्षाही मोठा पूर यावेळी या जिल्ह्यातील लोकांनी अनुभवला. पुराची दाहकता इतकी होती, की होतं नव्हतं ते सर्व वाहून गेलं. लोकांचा आयुष्यभराचा संसार उद्ध्वस्त झाला. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं, अनेकांचे जीव गेले. पुराने सर्वच वाहून नेलं. सध्या पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली असली, तरी लोकांना पुन्हा नव्याने सर्व उभारण्यास वेळ लागणार आहे. आयुष्यभर सांभाळलेला संसार पुन्हा नव्याने सुरु करावा लागणार आहे. घरं, शेती, व्यवसाय सर्वच पुन्हा उभारावं लागणार आहे. त्यामुळे नेमकी सुरुवात कुठून करायची, असा प्रश्न सध्या या पूरग्रस्तांना सतावतो आहे.