डोकं सटकतं, महिला अत्याचार प्रकरणी ‘हैदराबाद पॅटर्न’ राबवा, शरद पोंक्षेंची मागणी

| Updated on: Feb 16, 2020 | 4:56 PM

मनस्ताप होतो, डोकं सटकतं, छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्याने आठवण येते. त्यांनी जे कायदे केले होते, ते अंमलात आणायला हवेत, असं शरद पोंक्षे म्हणाले

डोकं सटकतं, महिला अत्याचार प्रकरणी हैदराबाद पॅटर्न राबवा, शरद पोंक्षेंची मागणी
Follow us on

पिंपरी चिंचवड : हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना ज्याप्रकारे चकमकीत कंठस्नान घातलं गेलं, तशीच शिक्षा महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना द्यायला हवी, जेणेकरुन महिलांवर अत्याचार करण्याचा विचार येण्यापूर्वीच पुरुष शिक्षेच्या आठवणीने थांबतील, असं परखड मत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी (Sharad Ponkshe on Crime against Women) व्यक्त केलं.

‘हे सर्व बोलण्याच्या पलिकडे गेलं आहे. मनस्ताप होतो, डोकं सटकतं, छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्याने आठवण येते. त्यांनी जे कायदे केले होते, ते अंमलात आणायला हवेत. हैदराबादमध्ये जे केलं ते उत्तमच होतं.’ असं शरद पोंक्षे म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संताप व्यक्त केला.

निर्भया हत्याकांडातील दोषींना सोडा, फाशी रद्द करा, अशा मागणीला आता जोर यायला लागला आहे, काय बोलणार अशा माणसांबद्दल. हैदराबाद पोलिसांनी केलं, ते बरं केलं म्हणायचं. केस वगैरे भानगडच ठेवली नाही. एका राज्यातच नाही, तर संपूर्ण देशात व्हायला पाहिजे’ अशी मागणी शरद पोंक्षे यांनी केली.

‘महिलांवरील अत्याचाराला तात्काळ उत्तर मिळालं पाहिजे. शिक्षाही कठोरात कठोर व्हायला हवी. त्याची दहशत बसली पाहिजे. एखाद्याच्या मनात वाईट विचार आला, तरी शिक्षा आठवून त्याने गप्प बसायला पाहिजे’ असं मत पोंक्षेंनी व्यक्त (Sharad Ponkshe on Crime against Women) केलं.