निर्भया बलात्कारातील दोषींची फाशी निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

| Updated on: Mar 02, 2020 | 2:03 PM

सर्वोच्च न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची क्यूरेटिव याचिका फेटाळली आहे.

निर्भया बलात्कारातील दोषींची फाशी निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
Follow us on

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी जवळपास निश्चित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (2 मार्च) या प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची क्यूरेटिव याचिका फेटाळली आहे (Supreme Court on Nirbhaya rape convict). 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली.

दोषी पवनकडून फाशीच्या शिक्षेला उशीर व्हावा या उद्देशानेच संबंधित याचिका दाखल केल्याचा त्याच्यावर आरोप झाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून फाशीच्या अंमलबजावणीचा मार्ग जवळपास मोकळा केला आहे. दोषी पवनने शुक्रवारी (28 फेब्रुवारी) सायंकाळी क्यूरेटिव याचिका दाखल केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ याचिका सुनावणीला घेत निकाली काढली. यासाठी न्यायालयाचं नियमित काम सुरु होण्याआधीच 5 मिनिटे चेंबरमध्येच सुनावणी घेण्यात आली.

क्यूरेटिव याचिकेवर न्यायाधीश चेंबरमध्येच सुनावणी घेतात. दोषी पवन गुप्ताच्या या याचिकेवर न्यायमूर्ती एन. व्ही. रमना, अरुण मिश्रा, आर. एफ. नरिमन, आर. भानुमती आणि अशोक भूषण यांनी सुनावणी घेतली. तसेच याचिका फेटाळत दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा केला.

तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषींना फाशी देण्यासाठी खास मेरठहून पवन नावाच्या जल्लादाला बोलावण्यात आलं आहे. तो फाशीच्या आधीची रंगीत तालीमही करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, दोषी पवनच्यावतीने सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा आधार घेऊन पटियाला हाऊस कोर्टातही याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच 3 मार्चच्या फाशीच्या शिक्षेचं डेथ वॉरन्ट रद्द करण्याची मागणी केली होती. यावर पटियाला कोर्ट आज सुनावणी करणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच दोषी पवनची याचिका फेटाळल्याने पटियाला कोर्टाकडून दोषींना कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे उद्या (3 मार्च) सकाळी 6 वाजता निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषींना फाशी दिली जाण्याची शक्यता आहे.

इतर दोषींचे सर्व कायदेशीर पर्याय संपले

दोषी पवन व्यतिरिक्त दोषी मुकेश, अक्षय आणि विनय यांचे शिक्षा कमी करण्याची किंवा माफीचे सर्व पर्याय संपले आहेत. तिघांच्याही क्यूरेटिव याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. यानंतर राष्ट्रपतींनी देखील त्यांच्या दया याचिका फेटाळल्या आहेत. असं असलं तरी दोषी अक्षय सिंहने राष्ट्रपतींसमोर पुन्हा नवी दया याचिका सादर केली आहे. याचाच आधार घेऊन दोषी अक्षय सिंहने पटियाला हाऊस कोर्टात 3 मार्चचं डेथ वॉरन्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. यावरही आज सुनावणी होणार आहे.

Supreme Court on Nirbhaya rape convict