कुपोषित मुलं उकाड्याने हैराण, जिल्हाधिकाऱ्याने स्वत:चे एसी रुग्णालयात लावले

| Updated on: Jun 07, 2019 | 2:14 PM

स्वरोचीष सोमवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व एसी काढून पोषण पुनर्वसन केंद्रात लावण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले.

कुपोषित मुलं उकाड्याने हैराण, जिल्हाधिकाऱ्याने स्वत:चे एसी रुग्णालयात लावले
Follow us on

भोपाळ : यावर्षी संपूर्ण देश हा उकाड्याने त्रस्त आहे. लोक उष्णतेने हैरान झालेले आहेत. दुसरीकडे, मान्सूनही लांबणीवर गेला आहे. तर अनेक शहरांमध्ये तापमानानेही 45 अंश सेल्सिअसच्या वरचा आकडा गाठला आहे. त्यामुळे सध्या देशातील जनतेला या उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. मध्‍य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील पोषण पुनर्वसन केंद्रातील (NRCs) कुपोषित मुलंही यातून सुटलेले नाहीत. येथील मुलंही उष्णतेने हैराण झाले होते. त्यांची ही परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी स्वरोचीष सोमवंशी यांनी या केंद्रात एअरकंडीशनर (AC) लावण्यात यावे, असे आदेश दिले.

आदेश दिल्यानंतर एसीसाठी ऑर्डर देण्यात उशीर होत होता. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ते केलं जे कदाचितच कुठल्या अधिकाऱ्याने केलं असेल. स्वरोचीष सोमवंशी यांनी जराही वेळ न वाया घालवता कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील एसी काढून पोषण पुनर्वसन केंद्रात लावण्याचे आदेश दिले. “अधिकाऱ्यांच्या चेंबरमधील एसी काढून ते NRCs मध्ये लावण्यात यावे”, असा आदेश स्वरोचीष सोमवंशी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिला. या आदेशाचे पालन करत उमरिया, पाली, चंदिया आणि मानपुरच्या NRCs मध्ये सध्या हे सर्व एसी लावण्यात येत आहेत.

सोमवंशी यांच्या या पुढाकाराने उमरिया हा जिल्हा NRCs मध्ये एसी लावण्यात येणारा पहिला जिल्हा बनला आहे.

“हा निर्णय तिथे वेळेवरच घेण्यात आला होता. NRC इमारतीच्या आत खूप उष्णता होती. आम्ही एसीची व्यवस्था करत होतो. मात्र, आम्हाला वाटलं की लहान मुलं आहेत, त्यांना तात्काळ ही सुविधा मिळायला हवी, त्यांना याची गरज आहे. ब्लॉकमध्ये 4 NRCs आहेत. आम्ही चारही ठिकाणी एसी लावले आहेत”, अशी माहिती सोमवंशी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

NRC मध्ये कुपोषित मुलांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जातात. इथे त्यांना घरच्यासारखं वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन आदिवासी कुटुंब येथे पूर्ण 14 दिवस उपचार घेऊ शकतील, असंही सोमवंशी यांनी सांगितलं.