मागील वर्षीचे पात्र शिक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत, उद्या पुन्हा 3.43 लाख शिक्षक TET देणार

| Updated on: Jan 18, 2020 | 1:26 PM

राज्यभरातील जवळपास 3.43 लाख शिक्षक रविवारी (19 जानेवारी) होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देणार आहेत (Teacher Eligibility Test 2020).

मागील वर्षीचे पात्र शिक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत, उद्या पुन्हा 3.43 लाख शिक्षक TET देणार
आता 21 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा होणार
Follow us on

पुणे : राज्यभरातील जवळपास 3.43 लाख शिक्षक रविवारी (19 जानेवारी) होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देणार आहेत (Teacher Eligibility Test 2020). ही परीक्षा प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकवण्यास पात्र होण्यासाठी असेल. पुण्यासह राज्यातील 9 विभागांसाठी ही परीक्षा असेल. विशेष म्हणजे 2018 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र ठरलेल्या शिक्षकांना अजूनही नोकरी मिळालेली नाही. त्यातच आता पुन्हा ही टीईटी होत आहे. याविषयी परीक्षार्थींमधून नाराजीही व्यक्त केली जात आहे (Teacher Eligibility Test 2020).

टीईटी 2 वर्षांनी घेतली जाते. यावर्षी यासाठी राज्यभरात एकूण 1,044 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी दोन पेपरसाठी परीक्षा होईल. पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 1 दरम्यान, तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 दरम्यान होईल. इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक वर्गांमध्ये शिकवण्याच्या पहिला पेपरमध्ये किमान 60 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांमध्ये शिकवण्यासाठी दुसऱ्या पेपरमध्ये किमान 60 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. पहिल्या पेपरसाठी डीएड आणि दुसऱ्या पेपरसाठी बीएडचं शिक्षण घेतलेलं असणं बंधनकारक आहे.

रविवारी होणाऱ्या या परिक्षेसाठी परीक्षार्थींना वेळेआधी 20 मिनिटे परीक्षा केंद्रांवर हजर राहणं आवश्यक आहे. त्यानंतर कुणालाही परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असंही परीक्षा महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने 2013 मध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत टीईटीची सुरुवात केली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक म्हणून काम करण्यासाठी शिक्षकाला या परिक्षेत पात्र होणं बंधनकारक आहे. दर 2 वर्षांनी ही परीक्षा घेणे अपेक्षित आहे. मागील परीक्षा 15 जुलै 2018 रोजी झाली होती. विशेष म्हणजे यापूर्वीच्या टीईटीमध्ये पात्र ठरलेल्या अनेक शिक्षकांना आजपर्यंत शिक्षक म्हणून नोकरीच मिळाली नाही. पात्र असतानाही शाळांमध्ये जागाच भरल्या न गेल्याने या शिक्षकांवर बेरोजगारीची वेळ आली. त्यामुळे किमान यावेळी तरी राज्य सरकार या परीक्षेत पात्र शिक्षकांना नोकरी देणार का? असाही प्रश्न शिक्षकांकडून विचारला जात आहे.