वीज बिल न भरल्याने जिल्हा परिषदेच्या 746 शाळा अंधारात

| Updated on: Jul 18, 2019 | 11:27 AM

वीजेच्या बिलाचा भरणा केला नाही म्हणून जिल्हा परिषदेच्या तब्बल 746 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या शाळांनी वीज बिलाचा भरणा केला नसल्याने महावितरणने हे पाऊल उचललं आहे.

वीज बिल न भरल्याने जिल्हा परिषदेच्या 746 शाळा अंधारात
Follow us on

सोलापूर : वीजेच्या बिलाचा भरणा केला नाही म्हणून जिल्हा परिषदेच्या तब्बल 746 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या शाळांनी वीज बिलाचा भरणा केला नसल्याने महावितरणने हे पाऊल उचललं आहे. सरकारकडून वीज बिलासाठी कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध करुन दिला जात नाही, त्यामुळे या शाळांना स्वत: वीज बिल द्यावं लागतं.

राज्य शासनाकडून वीज बिल भरण्यासाठी निधी मिळत नसल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व शाळेतील शिक्षकांना त्यांच्या पगारातून वर्गणी जमा करण्याची तरदूत करावी आणि लोकसहभागातून 50 टक्के रक्कम जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही शाळांनी ही तरतूद केल्याने 1845 शाळेतील वीज पुरवठा सुरळीत सुरु आहे.

दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील वीज बिलापोटी सुमारे 78 लाखांचा खर्च येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 70 लाखांच्या निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी दिली. सदरचे बिल हे व्यावसायिक पद्धतीने लावण्यात आले आहे, ते घरगुती दरांप्रमाणे लावण्यात यावे अशी मागणीही संजय राठोड यांनी केली.

दुसरीकडे, नियमानुसार वीज बिल थकीत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर पडळकर यांनी दिली.