TV9 इम्पॅक्ट : भारत सरकारचं नेटवर्क स्वप्नालीला मिळालं; जंगलातल्या झोपडीतील अभ्यास आता घरात

| Updated on: Aug 25, 2020 | 5:21 PM

घराजवळ मोबाईल नेटवर्क नसल्याने डोंगर माथ्यावर जाऊन ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या स्वप्नालीला अखेर भारत सरकारचं नेटवर्क मिळालं (Sindhudurg Swapnali Sutar get internet connection).

TV9 इम्पॅक्ट : भारत सरकारचं नेटवर्क स्वप्नालीला मिळालं; जंगलातल्या झोपडीतील अभ्यास आता घरात
Follow us on

सिंधुदुर्ग : घराजवळ मोबाईल नेटवर्क नसल्याने डोंगर माथ्यावर जाऊन ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या स्वप्नालीला अखेर भारत सरकारचं नेटवर्क मिळालं आहे (Swapnali Sutar from Sindhudurg get internet connection). टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि तिच्या ऑनलाईन शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या भारत नेट प्रकल्पांतर्गत इंटरनेटची सुविधा पुरवण्यात आली. सिंधुदुर्गमधील स्वप्नाली सुतारची शिक्षणासाठीची पायपीट टीव्ही9 ने समोर आणल्यानंतर सोशल मीडियासह सर्वच माध्यमांवर तिची कहाणी झळकली. त्यामुळे तिला आपल्या अडचणींवर मात करता आली आहे.

स्वप्नाली सध्या मुंबईत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. लॉकडाऊनमुळे ती गावातच अडकली. त्यामुळेन नंतरच्या काळात सुरु झालेल्या ऑनलाईन क्लासेससाठी नेटवर्कचा प्रश्न उभा राहिला. घरी अभ्यास करणं शक्य नसल्याने तिने उंच डोंगरावर जाऊन मिळणाऱ्या नेटवर्कचा वापर करण्यास सुरुवात झाली. यासाठी तिला जंगल भागात झोपडी बांधून थांबावं लागलं.

याची हकीकत टीव्ही 9 मराठीने दाखवल्यानंतर थेट दिल्लीतून पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली. यानंतर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (MEITY) सीएससी ई-गव्हर्नन्सचे सीईओ डॉक्टर दिनेश त्यागी, राज्य समन्वयक वैभव देशपांडे, कोकण विभागीय समन्वयक सुयोग्य दीक्षित यांच्या प्रतिसाद आणि प्रयत्नामुळे स्वप्नालीची समस्या दूर झाली. टीव्ही 9 च्या बातमीची दखल घेऊन अनेकांनी स्वप्नालीला मदतीचे हातही पुढे केले.

गणेश चतुर्थीच्या दिवशी भारत नेटची टीम दारीस्ते या दुर्गम गावात पोहोचली. ग्रामपंचायत दारिस्ते येथे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी केंद्र स्तरावरुन आणि राज्य स्तरावरुन तांत्रिक मदत मिळाल्याने सायंकाळपर्यंत ग्रामपंचायत येथे इंटरनेट कनेक्शन स्थापित करण्यात आलं. त्यासाठी रविवारी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ऑप्टिकल फायबर ओढत नेऊन स्वप्नालीच्या घरापर्यंत जोडणी करण्यात आली.

अखेर सर्व अडथळ्यांना पार करत स्वप्नालीला इंटरनेट कनेक्शन मिळालं आहे. यामुळे आता स्वप्नाली घरी बसूनच आपल्या लॅपटॉप आणि मोबाईलद्वारे कॉलेजमधील सर्व ऑनलाईन  क्लासेस अटेंड करु लागली आहे. तिच्या पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याची घोषणा केली आहे. त्याच योजनेतून स्वप्नालीला लाभ झाल्याने तिचा ऑनलाइन अभ्यास घरुनच सुरक्षितपणे सुरु झाला आहे. सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्यास कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनमध्ये देखील विद्यार्थ्यांचा अभ्यास अखंडित राहणार आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये गावी अडकली, ऑनलाईन शिक्षणासाठी नेटवर्क नाही, डोंगरदऱ्यात झोपडी टाकून तरुणीचा अभ्यास

Swapnali Sutar from Sindhudurg get internet connection