भारतातील हवा, पाणी चांगलं नाही : डोनाल्‍ड ट्रम्प

| Updated on: Jun 06, 2019 | 9:54 AM

भारत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडण्यात असमर्थ ठरला, तर अमेरिका जगातील सर्वात स्वच्छ हवामान असलेल्या देशांपैकी एक असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

भारतातील हवा, पाणी चांगलं नाही : डोनाल्‍ड ट्रम्प
Follow us on

मुंबई : अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी हवामान बदलाचं (Climate Change) खापर भारत, चीन आणि रशियावर फोडलं आहे. तर अमेरिका सर्वात स्वच्छ हवामान असलेल्या देशांपैकी एक असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. ब्रिटन दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशिया हे देश पर्यावरण संवर्धनाबाबत त्यांची जबाबदारी पार पाडण्यात असमर्थ ठरले, असा आरोप केला.

आयटीव्हीच्या मुलाखतीत ट्रम्प यांना ब्रिटनच्या राजकुटुंबातील सदस्‍य प्रिंस चार्ल्‍स यांच्यासोबतच्या भेटीबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशिया या तीन देशांतील हवा आणि पाणी चांगलं नाही. या देशांनी जगातील वातावरणाबाबत त्यांची जबाबदारी पार पाडली नाही, असं सांगितलं.

“आम्ही (ट्रम्प, प्रिंस चार्ल्‍स) 15 मिनिटांपर्यंत बैठक करणार होतो. मात्र, ही भेट दीड तास चालली. यादरम्यान प्रिंस चार्ल्‍स हेच अधिकवेळ बोलले. ते बराच वेळ हवामान बदलाविषयी (Climate Change) बोलले. तेव्हा मी त्यांना आवर्जुन सांगितलं की, सर्व आकडे पाहिल्यास अमेरिका सर्वात स्‍वच्‍छ हवामान असलेल्या देशांपैकी एक आहे”, असं ट्रम्प म्हणाले.

“चीन, भारत, रशिया आणि इतर काही देशांकडे चांगली हवा नाही. स्वच्छ पाणी नाही. त्यांनी प्रदुषण आणि स्वच्छतेही जराही काळजी नाही. जर तुम्ही तिथल्या काही शहरांमध्ये गेले, तर तुम्ही श्वासही घेऊ शकणार नाहीत. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही”, असा आरोप ट्रम्प यांनी केला.

डोनाल्ड ट्रम्प हे ब्रिटनच्या तीन दिवसीय राजकीय दौऱ्यावर होते. आतापर्यंत अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्षांचा हा तिसरा ब्रिटन दौरा होता. यापूर्वी 2003 मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश आणि 2011 मध्ये बराक ओबामा यांनी ब्रिटनचा दौरा केला होता.