बर्थडेला बोलावून 23 मुलं ओलीस, हॅण्डग्रेनेड फेकणाऱ्या माथेफिरुचा खात्मा

| Updated on: Jan 31, 2020 | 11:00 AM

उत्तर प्रदेशमध्ये 23 मुलांना ओलीस ठेवलेला सुभाष बाथम पोलीस चकमकीत ठार झाला. उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद येथील मोहम्मदाबाद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या करथरिया गावात गुरुवारी रात्री (30 जानेवारी) ही थरारक घटना घडली.

बर्थडेला बोलावून 23 मुलं ओलीस, हॅण्डग्रेनेड फेकणाऱ्या माथेफिरुचा खात्मा
Follow us on

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये बर्थडेला बोलावून 23 मुलांना ओलीस ठेवलेला सुभाष बाथम पोलीस चकमकीत ठार झाला. उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद येथील मोहम्मदाबाद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या करथरिया गावात गुरुवारी रात्री (30 जानेवारी) ही थरारक घटना घडली. तब्बल आठ तासांच्या थरारानंतर 23 मुलांची सुखरुप सुटका करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आलं (Farrukhabad Man Hostage Children). सुभाष बाथमसोबतच त्याच्या पत्नीचाही या घटनेत मृत्यू झाला. पोलिसांची गोळी लागल्याने पत्नी जखमी झाली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं (Farrukhabad Man Hostage Children).

मुलीच्या वाढदिवसाच्या बहाण्याने मुलांना बोलावलं

मुलीचा वाढदिवस आहे असं सांगत सुभाष बाथमने परिसरातील मुलांना घरी बोलावलं. त्याने 23 मुलांना घरात बोलावलं आणि त्यानंतर घराचा दरवाजा बंद केला. काही वेळाने जेव्हा मुलांच्या रडण्याचा आवाज आला, तेव्हा परिसरातील लोक त्याच्या घराभोवती जमले. लोकांनी सुभाषला मुलांना सोडण्याची विनंती केली. मात्र, सुभाष बाथम याने मुलांना सोडलं नाही. आधी आमदार नागेंद्र सिंह राठोडला बोलवा, त्यानंतर मुलांना सोडणार असं त्याने सांगितलं. तसेच, त्याने मुलांना बॉम्बने उडवण्याचीही धमकी दिली.

गावकऱ्यांपैकी एकजण सुभाषशी बोलायला गेला. मात्र, सुभाषने त्याच्या पायावर गोळी घालत त्याला जखमी केले. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

सुभाष बाथमने गुरुवारी 23 मुलांना ओलीस ठेवलं

सुभाष बाथमने गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास जवळपास 23 मुलांना ओलीस ठेवलं होतं. ही घटना कळताच संपूर्ण उत्तर प्रदेश प्रशासन या मुलांना सोडवण्याचा प्रयत्न करु लागले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेत मुलांच्या सुरक्षेचे निर्देश दिले.

पोलिसांनी सुभाषला अनेकदा त्याची मागणी विचारली. मात्र, त्याने काहीही सांगितलं नाही. त्यानंतर रात्री उशिरा त्याने पोलिसांवर गोळीबार केला. इतकंच नाही तर त्याने हॅण्डग्रेनेडही फेकले. पोलिसांनीही उत्तर देत गोळीबार केला. या गोळीबारात सुभाष बाथम ठार झाला. या घटनेत दोन पोलीसही जखमी झाले आहेत.

पोलिसांना दहा लाखाचं बक्षिस

पोलीस महासंचालक ओपी सिंह आणि प्रमुख सचिव गृह यांनी पत्रकार परिषद घेत सुभाष बाथम याच्या मृत्यूची माहिती दिली. एटीएस आणि एनएसजीची टीम येण्यापूर्वी सुभाष बाथमने पोलिसांना धमकावण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. यादरम्यान, आरोपीकडून गोळीबार करण्यात आला. त्याला उत्तर देत पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत आरोपी सुभाष बाथम याचा मृत्यू झाला. एकूण 23 मुलांना वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून या घटनेवर नजर ठेऊन होते. पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांनी 10 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं.

यापूर्वीही हत्येच्या आरोपाखाली 12 वर्षांची शिक्षा भोगली

सुभाष बाथमचा हा पहिला गुन्हा नाही. त्याने 2001 मध्ये त्याच्या मावशीच्या नवऱ्याची हत्या केली होती. या गुन्ह्यात त्याला 12 वर्षांचा तुरुंगवास झाला. तो काहीच दिवसांपूर्वी चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगून आला होता. त्यामुळे लोकांमध्ये त्याची भीती होती.

कुटुंबासोबतही त्याची वागणूक चांगली नव्हती. त्याने त्याच्या आईला घरातून हाकललं होतं. गावकऱ्यांच्या मते, त्याचं रोज पत्नीशी भांडण व्हायचं. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही त्याच्याशी सर्व संबंध तोडले होते.