Rishi Kapoor | संध्याकाळपुरती तरी दारुची दुकानं उघडा ते देशात आणीबाणी लावा, बिनधास्त ऋषी कपूरांची बेधडक वक्तव्यं

| Updated on: Apr 30, 2020 | 11:53 AM

सोशल मीडियावर आपल्या टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी 'लॉकडाऊनच्या काळात संध्याकाळपुरती तरी दारुची दुकानं उघडा' अशी मागणी केली होती (Rishi Kapoor Viral Tweets)

Rishi Kapoor | संध्याकाळपुरती तरी दारुची दुकानं उघडा ते देशात आणीबाणी लावा, बिनधास्त ऋषी कपूरांची बेधडक वक्तव्यं
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. ऋषी कपूर यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिका जितक्या गाजल्या, तितकीच सोशल मीडियावर त्यांनी केलेली बेधडक वक्तव्यंही प्रसिद्ध आहेत. चाहत्यांनी त्यांच्या व्यक्तिरेखांवर जितकं भरभरुन प्रेम केलं, तितकं समर्थन त्यांच्या ट्विटरवरील ‘भूमिके’ला क्वचितच मिळालं असेल. बहुतांश वेळा ते टीकेचे धनीच ठरले. मात्र ऋषी कपूर यांनी सच्चेपणा सोडला नाही. हा त्यांचा मनमोकळा स्वभावच चाहत्यांना हवाहवासा होता. (Rishi Kapoor Viral Tweets)

कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं. प्रकृती खालावल्यामुळे काल (बुधवारी) कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

सोशल मीडियावर आपल्या तिरकस टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी ‘लॉकडाऊनच्या काळात संध्याकाळपुरती तरी दारुची दुकानं उघडा’ इथपासून ‘देशात आणीबाणी लावा’ अशा अनेक मागण्या केल्या. 2 एप्रिलनंतर मात्र ट्विटर अकाउंटवर एकही पोस्ट केलेली नव्हती.

आणीबाणी लावा

‘देशात आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे? म्हणूनच आपल्याला सैन्याच्या मदतीची गरज आहे असं मी म्हणतो आहे. आणीबाणी’ असं ट्वीट ऋषी कपूर यांनी केलं होतं. ते सातत्याने कोरोना संसर्गाविषयी आणि त्या परिस्थितीत सुरु असलेल्या उपाययोजनांवर आपली मतं मांडत होते. ऋषी कपूर यांनी याआधी देशभरात सुरु असलेल्या बनावट आणि अस्वच्छ मास्कच्या उत्पादनावरही बोट ठेवलं होतं. पत्रकार मधू तेहरान यांचं एक ट्विट रिट्विट करत त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली होती.

संध्याकाळपुरती तरी दारुची दुकानं उघडा

‘सरकारने संध्याकाळी काही वेळासाठी तरी परवाना असलेली दारुची दुकानं उघडी ठेवायला हवीत. मला चुकीचं समजू नका. लोक आपापल्या घरी प्रचंड नैराश्यात आहेत. त्यांच्या अवतीभवती प्रचंड अनिश्चितता आहे. पोलिस, डॉक्टर आणि नागरिकांना ताण कमी करायचा आहे. तशीही काळ्या बाजारात दारुची विक्री सुरुच आहे. सरकारलाही उत्पादन शुल्काचा (एक्साईज) पैसा हवाच आहे. उद्विग्नतेसोबत नैराश्यही यायला नको. तसेही लोक (दारु) पित आहेतच, तर मग त्याला कायदेशीर करुन टाका. हे माझे विचार आहेत’ असं ट्वीट ऋषी कपूर यांनी 28 मार्चला म्हणजेच लॉकडाऊनच्या तिसऱ्याच दिवशी केलं होतं.

कपूरांची वेळ वाईट आहे

कोरोनाच्या संसर्गाविषयी निष्काळजी केल्याबद्दल गायिका कनिका कपूरवर गुन्हा नोंदवण्यात आला होता तेव्हा ऋषी कपूर यांनी कनिका कपूर आणि येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर याचा फोटो ट्वीट केला होता. ‘आजकाल काही कपूर लोकांची वाईट वेळ सुरु आहे. भीती वाटते. देवा इतर कपूरांची रक्षा कर रे, कोणतेही वाईट काम घडू नये, जय माता दी’ असं ऋषी कपूर यांनी 20 मार्चला लिहिलं होतं.

संबंधित बातम्या :

Rishi Kapoor | बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

Rishi Kapoor | बॉबी ते नगिना, ऋषी कपूर यांचे गाजलेले चित्रपट

Rishi Kapoor | राजू ते रौफ लाला, अभिनेते ऋषी कपूर यांची तेजस्वी कारकीर्द

(Rishi Kapoor Viral Tweets)