गेंड्याच्या पाठीवर प्रियकर-प्रेयसीने नाव कोरलं, सोशल मीडियावर संताप

| Updated on: Aug 24, 2019 | 2:48 PM

फ्रान्समधील प्राणीसंग्रहालयात गेंड्याच्या पाठीवर पर्यटकांनी आपली नावं कोरल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे

गेंड्याच्या पाठीवर प्रियकर-प्रेयसीने नाव कोरलं, सोशल मीडियावर संताप
Follow us on

पॅरिस : राष्ट्रीय स्मारकं, किल्ले यांच्या भिंतींवर तरुणांनी आपल्या प्रियकर-प्रेयसीचं नाव कोरल्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र फ्रान्समधील (France) प्राणी संग्रहालयात संतापजनक प्रकार समोर आला आहे. 35 वर्षांच्या गेंड्याच्या (Rhino) पाठीवर पर्यटकांनी आपलं नाव कोरलं आहे.

गेंड्याच्या पाठीवर ‘कॅमिली’ आणि ‘ज्युलियन’ अळी दोन नावं कोरण्यात आली आहेत. गेंड्याच्या पाठीचे फोटो फ्रान्समधील ‘ला पामिरे झू’च्या फेसबुक अकाऊण्टवर शेअर करण्यात आले आहेत. ‘पर्यटकांच्या मूर्खपणाविषयी साहजिकच आमचा संताप होत आहे’ असं फोटो शेअर करताना लिहिण्यात आलं आहे. हा गेंडा 35 वर्षांचा आहे.

पर्यटकांनी नखाच्या मदतीने गेंड्याच्या पाठीवरील कोरडी त्वचा खरवडली आणि स्वतःची नावं लिहिली, असं झूचे संचालक पिअर केली यांनी सांगितलं. गेंड्याला कदाचित हे समजलंही नसेल, मात्र ही मनोवृत्त निंदनीय असल्याचं ते म्हणाले.

गेंड्याच्या त्वचेवरील खाणाखुणा ब्रशच्या मदतीने तातडीने पुसून टाकल्या. त्यामुळे त्याला कोणताही अपाय झालेला नाही, असं झू प्रशासनाने स्पष्ट केलं. मात्र हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. त्यानंतर जगभरातील ट्विटर यूझर्सनी या घटनेचा निषेध केला आहे.

प्राणीसंग्रहालयाला भेट देणारे बहुसंख्य पर्यटक त्यांच्या त्वचेला हात लावून पाहतात. मात्र एखाद्या प्राण्याच्या अंगावर आपलं नाव कोरण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याचं झूतर्फे सांगण्यात आलं. यापुढे पर्यटकांना प्राण्यांजवळ जाऊ देण्यापूर्वी काळजी घेतली जाणार आहे.

‘ला पामिरे’ हे फ्रान्समधील सर्वाधिक गजबजलेले प्राणीसंग्रहालय आहे. प्राण्यांच्या संरक्षणासाठी आपण कटिबद्ध असल्याचं झू प्रशासनाकडून सांगण्यात आलं. जागोजागी कॅमेरे बसवण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे.