निधीअभावी वर्ध्याच्या 400 होमगार्ड्सवर बेरोजगारीची वेळ

| Updated on: Jan 15, 2020 | 5:34 PM

पोलीस यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून नागरिकांना सेवा पुरवणाऱ्या होमगार्ड्सना कार्यमुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे वर्ध्यातील तब्बल 400 होमगार्ड्सवर बेरोजगारीची वेळ आली आहे.

निधीअभावी वर्ध्याच्या 400 होमगार्ड्सवर बेरोजगारीची वेळ
Follow us on

वर्धा : पोलीस यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून नागरिकांना सेवा पुरवणाऱ्या होमगार्ड्सना कार्यमुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे वर्ध्यातील तब्बल 400 होमगार्ड्सवर बेरोजगारीची वेळ आली आहे. निधी उपलब्ध न झाल्याचं कारण सांगत या होमगार्ड्सना सध्याच कार्यमुक्त करण्यात आलं. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत त्यांना दुसरा रोजगार शोधावा लागणार आहे. त्याशिवाय, पोलिसांवरील कामाचा ताणही वाढण्याची शक्यता आहे.

पोलिसांसारखीच खाकी वर्दी घालून सण, उत्सव, कार्यक्रम, घटना, निवडणूक अशा ठिकाणी होमगार्डस पोलिसांना मदत करतात. आपत्ती, व्यवस्थापनाच्या वेळीही होमगार्डस मदतीला धावून जातात. याकरिता त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे अनेक युवकांनी यात रोजगार शोधला. पण आता निधी उपलब्ध न झाल्याचं सांगत वर्धा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतील होमगार्ड्सना सध्या कार्यमुक्त करण्यात आलं आहे. होमगार्ड्सच मानधनही दोन महिन्यापासून थकित आहे. अशीच परिस्थिती राज्यात इतरही जिल्ह्यात आहे. हा आदेश होमगार्ड्सची अडचण वाढवणारा ठरत आहे.

राज्यात सुमारे 45 हजार होमगार्डस आहेत. त्यांना सलग तीन महिने रोटेशन पध्द्तीने काम दिलं जातं. इतर वेळी होमगार्ड्स रोजगाराचा दुसरा पर्याय शोधतात. दिल्ली, मध्यप्रदेश इत्यादी राज्यांमध्ये होमगार्ड्सना किमान अकरा महिने रोजगार दिला जातो. पण होमगार्ड्सची संकल्पनाच उदयास आलेल्या महाराष्ट्रात होमगार्ड्सना बेरोजगारीचा सामना करावा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

होमगार्ड्सना तात्पुरती स्थगिती दिल्याने पोलिसांवरील कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. होमगार्ड्सना कामावर घेण्यापूर्वी महासमादेशक, उपमहासमादेशकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. होमगार्ड्सना पुन्हा कधी काम मिळणार याची शाश्वती नाही. तरी या होमगार्ड्सना नियमीत रोजगार द्यावा, त्यांची पद पूर्ववत करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

HomeGuards has to suffer from Unemployment

VIDEO :