VIDEO : महिलेने चोरट्याला पिटाळलं, विश्वास नांगरे पाटलांकडून कौतुकाची थाप

| Updated on: May 31, 2019 | 12:30 PM

नाशिक : शहरातील अशोकनगर परिसरात स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात भर दुपारच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला. यावेळी या केंद्राचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने चोराशी जोरदार मुकाबला केला आणि त्याला पिटाळून लावले. या महिलेचे नाव सविता मुर्तडक असे आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. त्यात महिलेची धाडसी झुंज स्पष्टपणे दिसत आहे.  या घटनेनंतर नाशिकचे […]

VIDEO : महिलेने चोरट्याला पिटाळलं, विश्वास नांगरे पाटलांकडून कौतुकाची थाप
Follow us on

नाशिक : शहरातील अशोकनगर परिसरात स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात भर दुपारच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला. यावेळी या केंद्राचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने चोराशी जोरदार मुकाबला केला आणि त्याला पिटाळून लावले. या महिलेचे नाव सविता मुर्तडक असे आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. त्यात महिलेची धाडसी झुंज स्पष्टपणे दिसत आहे.  या घटनेनंतर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या धाडसी महिलेला शाबासकीची थाप दिली आहे.

ऐन दुपारच्या वेळी एक चोर चाकू घेऊन सविता मुर्तडक यांच्या ग्राहक सेवा केंद्रात घुसला. एकटी महिला असल्याने आपल्याला सहज हात साफ करता येईल, असा विचार करुन संबंधित चोर चाकू घेऊन बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात घुसला. यावेळी सविता यांच्याकडे लाखो रुपयांची रोख रक्कम होती. चोरट्याचा बेत लक्षात येताच सविता मुर्तडक यांनी चोराशी एकाकी झुंझ दिली. महिला असल्याने आपण अगदी आरामात चोरी करुन जाऊ असा विचार करणाऱ्या या चोराला सविता मुर्तडक यांनी जवळजवळ 10 मिनिटे रोखून धरले. दरम्यान दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. महिलेचा रुद्रावतार पाहून चोरही घामाघूम झाला. चोराने सविता यांच्यावर अनेकदा चाकुने वार करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्याला रोखत बाहेर ढकलले. सविता मुर्तडक यांच्या विरोधामुळे चोरट्याचा लाखो रुपयांची रक्कम चोरण्याचा डाव फसला आणि केवळ 40 हजार रुपयांचीच चोरी करता आले.

दरम्यान, पोलीस या प्रकाराची चौकशी करत आहेत. ग्राहक सेवा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोराची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये सर्व ठिकाणी या महिलेच्या धाडसाचे कौतुक होत आहे. आपल्या जीवाची परवा न करता तिने चाकुधारी चोराचा केलेला मुकाबला सर्वांच्याच चर्चाचा विषय ठरत आहे.