अतिवृष्टीमुळं भातशेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषद उभारी देणार, भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय

| Updated on: Nov 17, 2020 | 9:09 AM

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं भात पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा परिषदेनं घेतला आहे. जिल्हा परिषदेमार्फत रब्बी हंगामात भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळं भातशेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषद उभारी देणार, भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय
Follow us on

रत्नागिरी: अतिवृष्टीमुळे राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी मदत करुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. पण अद्याप ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. अशा स्थितीत कोकणातील भात शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत उभारी दिली जाणार आहे. (Zilla Parishad helps farmers in Ratnagiri district)

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं भात पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा परिषदेनं घेतला आहे. जिल्हा परिषदेमार्फत रब्बी हंगामात भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर भाजीपाला बियाणं दिलं जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेनं महाबीजकडे बियाणांची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेनं त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेनं घेतलेल्या या निर्णयामुळं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांची शेती आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं होतं. पण अद्याप सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी अंधारातच घालवण्याची वेळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर आली आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, उस, भूईमुगाचं प्रचंड मोठं नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेतेमंडळींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात या नेत्यांनी दौरा केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. पण अजूनही ही मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही.

आचारसंहिता काळात मदत देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली होती. पण अद्याप हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या मदतीला उशीर लागण्याची शक्यता होती. पण अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता काळातही शेतकऱ्यांना मदत देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, सरकारकडून मदतीच्या आश्वासनाची पूर्तता अद्याप नाही!

केंद्राची आपत्तीग्रस्त राज्यांना 4381.88 कोटींची मदत, महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळासाठी केवळ 268 कोटी मंजूर

Zilla Parishad helps farmers in Ratnagiri district