कढीपत्ता काही दिवसांतच काळा पडतोय? फ्रिजमध्ये असा स्टोअर करा, बराच दिवस राहील फ्रेश
कढीपत्ता फ्रिजमध्ये ठेवताना पानांवर जास्त ओलावा राहिला तर तो लवकर काळा पडू शकतो. योग्य प्रकारे स्टोअर केल्यास तो अधिक काळ ताजा ठेवण्यास मदत होऊ शकते.

कढी, पोहे, सांबर,फोडणीचा भात असो,कढीपत्ता घातला की पदार्थाची चव आणि सुगंध आपोआप वाढते. त्यामुळे अनेकजण बाजारातून कढीपत्ता आणून सरळ फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र काही दिवसांतच पानं काळी पडतात किंवा सुकून जातात. मग काय ते फेकून द्यावे लागतात. कढीपत्ता खराब होण्यामागे त्यातील ओलावा हे महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवताना काही गोष्टींची काळजी घेतली तर कढीपत्ता फ्रेश ठेवण्यास मदत होऊ शकते.
कढीपत्ता धुवून लगेच फ्रिजमध्ये ठेवू नका :बाजारातून कढीपत्ता आणल्यावर लगेच फ्रिजमध्ये ठेवू नका. पानांवर ओलावा राहिल्यास कढीपत्ता लवकर काळा पडण्याची शक्यता असते.त्यामुळे धुवून ठेवत असाल तर धुतल्यानंतर त्याला पुर्णपणे सुकू द्या. नाहीतर तसाच फ्रिजमध्ये ठेवून वापरताना धुवा.
पेपर टॉवेलची मदत घ्या : कढीपत्ता फ्रेश ठेवण्यासाठी पेपर टॉवेलचा वापर करा. कढीपत्ता धुतल्यानंतर पेपर टॉवेलने हलकेच पुसून घ्या. त्यानंतर पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि एअरटाईट कंटेनर किंवा झिप लॉक बॅगमध्ये ठेवा.
देठापासून पानं वेगळी करा : कढीपत्ता साठवताना पानं देठापासून वेगळी करून ठेवा. मात्र त्याआधी खराब पाने वेगळी करा. एक खराब पान बाकीची पानं सुद्धा खराब करू शकतं. चांगली पानं पेपरमध्ये गुंडाळून डब्यात ठेवा.
कढीपत्ता साठवताना ओलाव्याची काळजी घ्या :कढीपत्ता जास्त काळ हिरवा आणि ताजा ठेवायचा असेल तर शक्य तितका कोरडा ठेवणं महत्त्वांच आहे. योग्य प्रकारे हाताळल्यास कढीपत्ता कित्येक दिवस फ्रेश राहू शकतो.