भयानक ! पत्नीच्या डोहाळेजेवणाच्या दिवशीच पतीची निर्घृण हत्या, जन्माआधीच पित्याचं छत्र हरपलं..

| Updated on: Feb 23, 2024 | 12:50 PM

आई-वडील बनणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. आपल्या बाळाचा जन्म, त्याची हालचाल, प्रगती, बोबडे बोल, अनुभवायची प्रत्येक मात्या-पित्याची इच्छा असते. पण काहींच्या आयुष्यात हा आनंद तर येतो, पण तो अनुभवायच्या आधीच नशीब असं उलटं फिरत की एका क्षणात होत्याचं नव्हतं असं होतं

भयानक ! पत्नीच्या डोहाळेजेवणाच्या दिवशीच पतीची निर्घृण हत्या, जन्माआधीच पित्याचं छत्र हरपलं..
Follow us on

सुनील ढगे टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 23 फेब्रुवारी 2024 : आई-वडील बनणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. आपल्या बाळाचा जन्म, त्याची हालचाल, प्रगती, बोबडे बोल, अनुभवायची प्रत्येक मात्या-पित्याची इच्छा असते. पण काहींच्या आयुष्यात हा आनंद तर येतो, पण तो अनुभवायच्या आधीच नशीब असं उलटं फिरत की एका क्षणात होत्याचं नव्हतं असं होतं. अशीच एक दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली. तेथे बाळाच्या जन्माच्या आधीच त्याच्या डोक्यावरचं पित्याचं छत्र हरपलं. बायकोच्या डोहाळेजेवणाच्या दिवशीच पतीचा मृत्यू झाला. क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणामुळे एका व्यक्तीचा बळी गेला आणि त्याच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला.

नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील जाततरोडी परिसर अवघ्या २२ वर्षांच्या तरुणाची त्याच्या कुटुंबियांसमोर, गर्भवती पत्नीसमोरच निर्घृण हत्या झाली. महेश विठ्ठल बावणे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. महेश बावणे यांची पत्नी गर्भवती असून काल त्यांचा सातवा महिना डोहाळेजेवणाचा कार्यक्रम होता. पण त्या आनंदाला गालबोट लागलं. त्यावेळी बाप-मुलाने मिळून महेश याची हत्या केल्या बावणे कुटुंबात सुरू असलेला आनंदोत्सव हा दुःखात बदलला.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश याच्या पत्नीच्या हातावर त्याच परिसरात राहणारी एक तरूणी मेहंदी काढत होती. तेवढ्यात आरोपी शंकर भोलासिंह राठोड हा तिथे आला आणि जोरदार शिवीगाळ करू लागला. आरोपी भोला याच्याकडून मेहंदी काढणाऱ्या तरुणीच्या वडिलांनी पैसे उधार घेतले होते. मात्र ते पैसे अद्याप परत केले नव्हेत, त्यामुळे
संतापलेल्या आरोपीने त्या तरूणीला उद्देशून शिवीगाळ केली. तेवढ्यात महेश बावणे हा मध्ये पडला आणि त्याने आरोपी भोला राठोडची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला. माझ्या घरी कार्यक्रम आहे, त्यामुळे शिवीगाळ करू नका असं त्याला म्हंटल्यानंतर आरोपी भोला हा आणखी संतापला.

त्याने त्याच्या मुलाला बोलवून घेतलं. त्यानंतर बाप-लेकाने संगनमत करून महेशवर हल्ला केला. आरोपीने चाकूने महेशच्या छातीवर वार केले. महेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळताचं आरोपींनी घटनास्थळ सोडून पळ काढला. या घटनेत महेशचा जागीच मृत्यू झाला आहे. भरल्या घरात कार्यक्रम सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. बाळाचा जन्म होण्याआधीच त्याच्या डोक्यावरून बापाचं छत्र उडाल. तरण्याताठ्या मुलाचा असा मृत्यू झाल्याने त्याच्या घरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आरोपी पिता, पुत्र सराईत गुन्हेगार असून पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचा मुलगा अद्याप फरार आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.