तुकाराम मुंडेंचा आदर्श नि पल्लवीची यूपीएससीची तयारी, इंजिनीअरिंगनंतर अखेर यश मिळवलेच

| Updated on: Oct 12, 2022 | 5:44 PM

यूपीएससीच्या कोचिंगसाठी दिल्लीला जाण्यासाठी वडील दोन लाख रुपये खर्च करू शकणार नाहीत.

तुकाराम मुंडेंचा आदर्श नि पल्लवीची यूपीएससीची तयारी, इंजिनीअरिंगनंतर अखेर यश मिळवलेच
मुलीनं घेतली उंच भरारी, यूपीएससी केली पास
Image Credit source: tv 9
Follow us on

सुरेंद्रकुमार आकोडे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : आर्थिक परिस्थिती कशी असो मात्र जिद्द व चिकाटी असेल तर यश हमखास मिळते. हे अमरावती येथील बिछू टेकडी या स्लम (झोपडपट्टी)भागात राहणाऱ्या पल्लवी देविदास चिंचखेडे या विद्यार्थिनीने दाखवून दिले. केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रतीक्षा यादीचा निकाल लावला. यात अमरावतीची पल्लवी देविदास चिंचखेडे हिची निवड झाली. पल्लवी सातव्या वर्गात शिकत असतानाच त्यावेळी तुकाराम मुंडेंसह राज्यातील सहा जण यूपीएससीची परीक्षा पास झाले होते.

हीच प्रेरणा व जिद्द घेऊन आपणही यूपीएससीची परीक्षा पास करावी, अशी प्रेरणा पल्लवी हिला मिळाली. मात्र घरची परिस्थिती जेमतेम. वडील देविदास हे इमारतींना रंग देण्याचे काम करतात. आई शिवणकाम करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात.

यूपीएससीच्या कोचिंगसाठी दिल्लीला जाण्यासाठी वडील दोन लाख रुपये खर्च करू शकणार नाहीत. म्हणून पल्लवी हिने मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तीन वर्षे नोकरी करून पैसे शिल्लक ठेवले. त्यातूनच दिल्लीला जाऊन यूपीएससीची तयारी केली.

तुकाराम मुंडे IAS झाले. त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. नंतर पुढचा मार्ग वडिलांनी दाखवला, असे पल्लवी सांगते. घरची आर्थिक परिस्थिती कितीही वाईट असली तरीही जिद्द चिकाटी व टॅलेन्ट असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही.

या परीक्षेत समाजातील दुर्बल घटकातील लोकांसाठी शिक्षणासाठी व महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे पल्लवी चिंचखेडे हिने सांगितलं.

श्रीमंत लोकांच्या घरी पेंटिंग काम करता करता आपली मुलं ही चांगली घडावेत. मुलांनी काही तरी वेगळे करावं, असं देविदास चिंचखेडे यांना वाटत होते. पल्लवी सातव्या वर्गात असताना तुकाराम मुंडेसह सहा जण राज्यातून यूपीएससीची परीक्षा पास झाले होते.

तुकाराम मुंडे यांच्या सत्काराला देविदास चिंचखेडे हे पल्लवीला घेऊन गेलेत. त्याचवेळी आपल्या मुलीलाही आपण आयएएस करावे ही जिद्द निर्माण झाली. जे गरीब मुले आहेत ज्यांच्याकडे पैसे नसेल तरीही शासनाच्या अनेक योजना आहेत. जिद्द व चिकाटी असेल तर यश निश्चित मिळते, असे पल्लवीचे वडील देविदास चिंचखेडे यांनी सांगितले.

घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून आपण शिकू शकलो नाही, असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पल्लवीनं मिळवलेले घवघवीत यश हे युवा पिढीला प्रेरणा देणारे ठरते.