Aurangabad: दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 80 सिंचन प्रकल्पांची पडझड, 51 कोटी रुपयांचे नुकसान

जिल्ह्यातील 10 मध्यम व 63 लघु सिंचन प्रकल्प तसेच 7 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे पाहणीतून समोर आले आहे. हे बंधारे 1950 ते 2000 या कालावधीत बांधले असून 10-12 वर्षात त्यांची निधीअभावी देखभाल, दुरूस्ती झालेली नाही.

Aurangabad: दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 80 सिंचन प्रकल्पांची पडझड, 51 कोटी रुपयांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 80 सिंचन प्रकल्पांचे नुकसान झाले आहे.
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 2:13 PM

औरंगाबादः गेल्या दोन महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) शेतासोबतच सिंचन प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे. सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या 80 लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांचे तब्बल 51.71 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. काही प्रकल्पाच्या भिंती कोसळल्या, तर काहींना भगदाडे पडले. काही ठिकाणी केटी बंधारे वाहून गेले आहेत. पुढील धोका टाळण्यासाठी त्यांची दुरूस्ती आवश्यक असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे एकिकडे पाटबंधारे विभागाचे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तर प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर औरंगाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एम.निंभोरे (A.M. Nimbhore) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पांची क्षेत्रीय पाहणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना (Collector of Aurangabad) सादर करण्यात आला. या प्रकल्पातून एकूण 42224 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.

1950 ते 2000 या काळातील बंधारे

जिल्ह्यातील 10 मध्यम व 63 लघु सिंचन प्रकल्प तसेच 7 कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे अतीवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे पाहणीतून समोर आले आहे. हे बंधारे 1950 ते 2000 या कालावधीत बांधले असून 10-12 वर्षात त्यांची निधीअभावी देखभाल, दुरूस्ती झालेली नाही. सततच्या पावसाने हे प्रकल्प 100 टक्के क्षमतेने भरले. तर 28 सप्टेंबरच्या गुलाब चक्रीवादळामुळे 100 मीमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे धरणे आणि कालव्यांची वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे धरणांना धोका निर्माण झाल्याचे निंभारे यांनी सांगीतले.

दुरूस्तीसाठी 51.71 कोटीची गरज

पाटबंधारे उपविभाग 1 मधील 2 मध्यम आणि 20 लघु प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी 15.56 कोटी रूपये, उपविभाग 2 मधील 1 मध्यम आणि 15 लघु प्रकल्पांसाठी 13.76 कोटी, उपविभाग 3-कन्नडमधील 2 मध्यम आणि 16 लघु प्रकल्पांसाठी 6.14 कोटी, उपविभाग 4-कन्नडच्या 2 मध्यम आणि 4 लघु प्रकल्पासाठी 6.15 कोटी तर उपविभाग 5-सिल्लोडच्या 3 मध्यम आणि 14 लघु प्रकल्पांसाठी 10.10 कोटी रूपये लागणार आहेत. जिल्ह्यातील एकूण 10 मध्यम आणि 69 लघु प्रकल्पांच्या दुरूस्तीसाठी 51.71 कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रस्ताव

सिंचन वर्ष 2021-22 चा रबी आणि उन्हाळी हंगाम राबवण्याकरिता अतीवृष्टीमुळे झालेले नुकसान दुरूस्त करणे अत्यावश्यक आहे. कालव्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत पाणी जाण्यासाठी तसेच धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही कामे तात्काळ करावी लागतील. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती ए.एम.निंभोरे, कार्यकारी अभियंता, औरंगाबाद पाटबंधारे विभाग यांनी दिली आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad Gold: सोन्यानं झटकली मरगळ, दरात काहीशी वाढ, वाचा औरंगाबादचे दर काय?