शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याचा पुरावा दिल्यास खासदारकीचा राजीनामा देईन; संशयाच्या भोवऱ्यातील ‘या’ खासदाराचं थेट आव्हान

| Updated on: Feb 18, 2023 | 9:21 AM

जे झाले ते लोकांना पटलेलं नाही. सत्तेचा फायदा घेऊन आज जरी मनासारखं निर्णय करून घेतला असला तरी सत्ता कुणाची आयुष्यभर राहत नाही. भविष्यात शिवसेनेचा निकाल हा एके दिवशी आमच्याच बाजूने लागेल विश्वास ठेवा.

शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याचा पुरावा दिल्यास खासदारकीचा राजीनामा देईन; संशयाच्या भोवऱ्यातील या खासदाराचं थेट आव्हान
Uddhav Thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

परभणी : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्हं शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाची ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या एका खासदाराने शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केल्याची धक्कादायक माहितीसमोर आली. त्यामुळे आणखीनच खळबळ उडाली. शिंदे गटाला मदत करणारा 14 वा खासदार कोण? असा सवालही या निमित्ताने करण्यात आला. परभणीतील ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी शिंदे गटाच्या बाजूने निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिल्याची दबक्या आवाजात चर्चाही सुरू झाली. मात्र, स्वत: संजय जाधव यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याचा पुरावा दिल्यास खासदारकीचा राजीनामा देईन, असं आव्हानच संजय जाधव यांनी दिलं आहे.

खासदार संजय जाधव यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजप खोटी माहिती पसरवत आहे, असं कुठल्याही खासदारांना असं खोटं शपथपत्र दिला असेल असा मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. ज्यांना तिकडे जायचं होतं ते गेले, ज्यांना उद्धव साहेबांसोबत राहायचे ते उद्धवसाहेबांसोबतच आहेत. उगाच बात का बतंगड बनवला जात आहे, असं संजय जाधव म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तर मी पुरावा देईन

मी शिंदे गटाच्या बाजूने निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिल्याचा पुरावा मीडियाकडे असेल तर मला द्या. नाहीतर माझ्याजवळ आहे मी देईन. तुमच्याकडे काही पुरावा असेल तर मला द्या. मी लगेच खासदारकीचा राजीनामा देईल, असं आव्हानच जाधव यांनी यावेळी दिलं.

चिन्ह दिलं गेलं

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेलं नाही तर भाजपकडून त्यांना देण्यात आलं आहे. हा भारतीय जनता पार्टीचा डाव आहे. कारण त्यांना शिवसेना मोडायची होती. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात होतो आहे आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांच्याच सोबत राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

थोडे दिवस परेशानीचे

सत्य परेशान हो सकता है, किंतु पराजित नही. थोडे दिवस परेशानीचे आहेत. मात्र न्याय आम्हाला नक्कीच मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच बाळासाहेब ठाकरेंवर अलोट प्रेम करणारा परभणी जिल्हा आहे. परभणीमध्ये शिवसेना फोडण्याचा काही परिणाम झाला नाही. आणि भविष्यातही होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

तरीही निकाल दिला

जे झाले ते लोकांना पटलेलं नाही. सत्तेचा फायदा घेऊन आज जरी मनासारखं निर्णय करून घेतला असला तरी सत्ता कुणाची आयुष्यभर राहत नाही. भविष्यात शिवसेनेचा निकाल हा एके दिवशी आमच्याच बाजूने लागेल विश्वास ठेवा. आमचा निकाल लागेपर्यंत तुम्ही निकाल देऊ नका असं कोर्टाने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं. तरीही निवडणूक आयोगाने हा निकाल दिला, असंही त्यांनी सांगितलं.

भाजप मुघलांपेक्षा पुढे

लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर भाजपला हरवणे गरजेचे बनले आहे. भाजप मुघलांपेक्षा पुढे गेले आहेत. पण संविधान वाचवायचं असेल तर भाजपचा पराभव करणे आता गरज बनली आहे, असंही ते म्हणाले.