औरंगाबाद महापालिकेची उद्यापासून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम, 1 ते19 वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देणार

| Updated on: Sep 20, 2021 | 5:35 PM

1 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 2,20,228 लाभार्थ्यांना जंत नाशक गोळी त्यांच्या वयोगटाप्रमाणे देण्यात येणार आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय स्तरावर ही मोहीम राबवतील.

औरंगाबाद महापालिकेची उद्यापासून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम, 1 ते19 वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देणार
21 ते 28 सप्टेंबरदरम्यान 1 ते 19 वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्या देणार.
Follow us on

औरंगाबाद: केंद्र आणि राज्य शासनांच्या सूचनांनुसार औरंगाबाद महापालिकेअंतर्गत उद्यापासून म्हणजेच 21 ते 28 सप्टेंबर हे दहा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन (National Dewarming Drive) मोहीम साजरी करण्यात येणार आहे. केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात 29% (241 दशलक्ष) आढळले आहे. त्याच अनुषंगाने राज्यात ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ (National Dewarming Day) वर्षातून दोनदा राबविण्यात येते. जंतनाशक मोहिमेमुळे अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदे होत असतात. त्यामध्ये बालकांमधील रक्तक्षय, अशक्तपणा व कुपोषणावर नियंत्रण तसेच बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास होणे याचा समावेश आहे.

शाळेत न जाणाऱ्या मुलांपर्यंतही गोळी पोहचवणार

औरंगाबाद महानगरपालिके मार्फत 1 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 2,20,228 लाभार्थ्यांना जंत नाशक गोळी त्यांच्या वयोगटाप्रमाणे देण्यात येणार आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय स्तरावर ही मोहीम राबवतील. कोविड 19 मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून ही गोळी देण्यात येणार आहे .ही मोहीम 7 दिवस चालणार असून 01 ते 05 वयोगटातील सर्व बालकांना अंगणवाडी केंद्रामध्ये तसेच 6 ते 19 वयोगटातील शाळेत न जाणाऱ्या मुला मुलींना समुदाय स्तरावर घरोघरी आशा वर्कर्स मार्फत व अंगणवाडी केंद्रामध्ये जंतनाशक गोळी मोफत देण्यात येणार आहे.

जंतनाशक गोळीचे दुष्परिणाम होतात का?

जंतनाशक औषधीमुळे होणारे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असतात. त्यात सौम्य प्रमाणात चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे किंवा डोके दुखी, पोटदुखी व थकवा यांचा समावेश आहे. हे दुष्परिणाम जंतसंसर्गामुळे व त्यावर होणाऱ्या औषधाच्या परिणामामुळे होतात. व ते तात्पुरते असून शाळा व अंगणवाडी केंद्रावर सहजगत्या हाताळण्यासारखे असतात.

बालकांच्या वाढीत अडथळा कृमीदोषाचा

लहान मुलांचा शैक्षणिक विकास होण्याबरोबरच शारीरिक विकास होणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. मैदानात खेळत असताना मुलांकडे नीट लक्ष न दिल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामध्ये कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे.   वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कृमीदोष हे कुपोषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. या सर्व कारणास्तव केंद्र आणि राज्य सरकारतर्फे शहरी तसेच ग्रामीण भागात जंतनाशक मोहीम राबवण्यात येते. (National Deworming Drive will start from tomorrow in Aurangabad Municipal corporation)

इतर बातम्या- 

औरंगाबाद पालिका निवडणुकीसाठी भाजपचा स्वबळाचा नारा, बड्या मंत्र्याचे स्पष्ट संकेत, शिवसेनेची कोंडी ?

डेंग्यू नियंत्रणासाठी नवी मुंबई महापालिकेची प्रभावी उपाययोजना; नागरिकांची फवारणीची मागणी