‘आमचे घर पाडत होते, तेव्हा तुम्ही कुठे होते’, पंकजा मुंडेंच्या सभेत स्थानिकांचा गोंधळ

| Updated on: Oct 13, 2019 | 3:08 PM

शहरातील अवैध बांधकामं, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्याकडे पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी सभेत गोंधळ घातला (Pankaja Munde Chinchwad Rally). मात्र, हे लोक दुसऱ्या पक्षाने पाठविल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला.

आमचे घर पाडत होते, तेव्हा तुम्ही कुठे होते, पंकजा मुंडेंच्या सभेत स्थानिकांचा गोंधळ
Follow us on

पिंपरी : चिंचवडच्या थेरगाव येथे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती (Pankaja Munde Chinchwad Rally). चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आज (13 ऑक्टोबर) ही सभा घेण्यात आली. यावेळी शहरातील अवैध बांधकामं, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्याकडे पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी सभेत गोंधळ घातला (Pankaja Munde Chinchwad Rally). मात्र, हे लोक दुसऱ्या पक्षाने पाठविल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त पंकजा मुंडे यांची थेरगाव येथे सभा आयोजित केली होती. पंकजा मुंडे यांचे भाषण सुरु असताना सभेतील काही तरुण आणि महिलांसह नागरिक उभे झाले. ज्यावेळी आमचे घर पाडत होते, तेव्हा तुम्ही कुठे होते, असा सवाल करत या लोकांनी त्यांचा आक्रोश व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामं, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्यांकडे मुंडे यांचे लक्ष वेधण्याचा या लोकांचा प्रयत्न होता.

रिंगरोडचा प्रश्न सुटला पाहिजे. रिंग रोडमुळे अनेकांची घरे बाधित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे असे म्हणतात. इथे मात्र, आमच्या घरांवर हातोडा मारत आम्हाला बेघर केले जात आहे. अवैध बांधकामं, शास्तीकर 100 टक्के रद्द झाला पाहिजे, अशी मागणी सभेला उपस्थित असलेल्या महिलांनी केली. त्यामुळे स्टेजवरील स्थानिक नेते मंडळी अवाक झाले.

गोंधळ सुरु असताना देखील पंकजा मुंडे यांनी भाषण सुरुच ठेवले. तुमच्यावर दुसऱ्या पक्षाची छाप आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. तर आम्ही कोणत्याही पक्षाचे नसल्याचं नागरिकांनी ठणकावून सांगितलं. आम्हाला कोणी पाठविले नाही, असं सांगण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. लोकशाहीत हे घडणं अपेक्षित आहे. घराचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी घोषणा देणाऱ्या या लोकांना ताब्यात घेतलं.

पाहा व्हिडीओ :