आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्य अंधाराच्या खाईत, भाजप नेते केशव उपाध्ये यांचा आरोप

| Updated on: Oct 14, 2021 | 5:38 PM

लॉकडाऊन काळात मागणी वाढल्याने वीज बिलांमध्ये वाढ झाल्याचे उर्जामंत्री सांगत होते. दुसरीकडे राज्यातील विजेची मागणी घटली असल्याचे केंद्र सरकारला कळविले जात होते. यातून आघाडी सरकारचा दुटप्पीपणा उघड झाला आहे, असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला.

आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्य अंधाराच्या खाईत, भाजप नेते केशव उपाध्ये यांचा आरोप
electricity crisis
Follow us on

मुंबई : राज्य तसेच देशातील काही राज्यांमध्ये विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक बाजारात कोळसा महागल्यामुळे त्याच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. या सर्व कारणामुळे वीज टंचाईचे संकड महाराष्ट्रासमोर उभे राहिले आहे. याच मुद्द्यावरून राज्य सरकार केंद्रावर टीका करत आहे. तर दुसरीकडे भाजपने महाविकास आघाडीच यासाठी जबाबदार असल्याचा दावा केलाय. आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्य सरकार अंधाराच्या खाईत लोटले गेले, अशी घणाघाती टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली आहे.

विजेच्या बाबतीत आघाडी सरकारचा दुटप्पीपणा उघड

केंद्र सरकारच्या कोल इंडिया या कंपनीने 9 मार्च 2021 रोजी पत्र पाठवून कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असून गरजेप्रमाणे हा साठा उचलावा असे कळविले होते. भुसावळ, कोराडी, चंद्रपूर येथील औष्णिक उर्जा निर्मिती प्रकल्पांच्या व्यवस्थापकांना कोल इंडियाने पत्र पाठवून कोळशाच्या उपलब्ध साठ्याची माहिती कळवली होती. या पत्राला महाजेनकोने 21 मार्च 2021 रोजी पत्र पाठवून राज्यातील विजेची मागणी घटली असल्याचे कळविले होते. एकीकडे लॉकडाऊन काळात मागणी वाढल्याने वीज बिलांमध्ये वाढ झाल्याचे उर्जामंत्री सांगत होते. दुसरीकडे राज्यातील विजेची मागणी घटली असल्याचे केंद्र सरकारला कळविले जात होते. यातून आघाडी सरकारचा दुटप्पीपणा उघड झाला आहे, असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा

तसेच ऊर्जा खात्याच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्यातील जनतेला वीज टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे या सर्व गोष्टींचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा अशी मागणीदेखील उपाध्ये यांनी केली.

शिवसेना नेतृत्व लाचारीपोटी मौन बाळगून

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झालं त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेत घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच मुद्द्यावर उपाध्ये यांनी आमदारावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. “राष्ट्रवादी नेतृत्वाने या घटनेबाबत अजून भाष्य केलेले नाही. राष्ट्रवादीला सत्तेचा माज आल्याचेच यातून दिसते. या घटनेबाबत शिवसेना नेतृत्व लाचारीपोटी मौन बाळगून आहे,” असे उपाध्ये म्हणाले. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले 10 हजार कोटींचे पॅकेज ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रमाण पाहता सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे,” असा आरोप उपाध्ये यांनी केला.

इतर बातम्या :

ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था, ठाकरेंनी काढलेल्या GR ची होळी करणार : सदाभाऊ खोत

… तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत दिसले असते; गुलाबराव पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

शिवसेनेची रणरागिणी चाकणकरांच्या मदतीला धावली, मनीषा कायंदेंकडून चित्रा वाघ यांचा खरपूस समाचार

(bjp spokesperson keshav upadhye criticizes maha vikas aghadi on electricity crisis)