सावित्री बाई फुलेंच्या जन्मगावाला ‘ब’दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित करणार- मुख्यमंत्री

| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

सातारा : महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात पुरोगामित्वाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यामुळे राज्याला पुरोगामी म्हणून ओळख मिळाली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नायगाव या त्यांच्या जन्मगावी महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्री […]

सावित्री बाई फुलेंच्या जन्मगावाला ‘ब’दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित करणार- मुख्यमंत्री
Follow us on

सातारा : महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात पुरोगामित्वाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यामुळे राज्याला पुरोगामी म्हणून ओळख मिळाली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नायगाव या त्यांच्या जन्मगावी महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्री बाई फुले यांच्या 188 व्या जयंती निमित्त केली.

सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन करुन सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित स्मारक आणि चित्रशिल्पाची पाहणी केली. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला.

“क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्री शिक्षणात भरीव कामगिरी करुन त्यांनी सनातनी समाजाला झणझणीत उत्तर दिले. आज या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी त्या काळी या गोष्टी खूप कठीण होत्या. हे कार्य करताना समाजाचा मोठा रोष त्यांना सहन करावा लागला होता”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून सावित्री बाई फुले यांच्या मूळगावी विकासकामाचा आराखडा काही प्रमाणात अपूर्ण आहे. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी नायगाव येथील विकास आराखड्यांबाबत घोषणांचा पाऊस पाडला. महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य घालवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या नायगावला ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ प्रस्ताव पाठवावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

नायगावमध्ये “सावित्रीसृष्टी” उभारणीसाठी मान्यता देऊ. तसेच पुणे शहरातील ज्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारणीचा प्रश्न कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. मात्र सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन स्मारक उभे करण्याचे काम सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या परिसरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची क्षमता लवकरच वाढवण्यात येईल. नायगाव ते मांढरदेवी हा रस्ता लवकरच करण्यात येईल. नीरा-देवधर धरण लाभक्षेत्रातील योजनांची कामे मार्गी लावून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवू. तसेच लिफ्ट इरिगेशन प्रकल्पांची 81 टक्के वीज बिलं सरकार भरणार, तर केवळ 19 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. त्यामुळे वीज बिलाअभावी कोणतीही लिफ्ट इरिगेशन योजना बंद पडणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देशातील महिला आणि वंचितांसाठी फुले दाम्पत्याने भरीव काम केले आहे. फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असून राज्य सरकार या विषयी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगत, संत सावता माळी यांचे जन्म गाव असणाऱ्या अरणचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला असून तेही काम वेगाने मार्गी लावणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

नायगाव येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही फुले यांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. बऱ्याच वर्षानंतर नायगावला आलो असल्याचं यावेळी भुजबळांनी सांगितलं. तर सत्ताधारी भाजपा पक्ष संविधान मानत नाही, शाहु, फुले, आंबेंडकरांना मानत नाही. मात्र मी या स्मारकापुढे नतमस्तक होऊन फुले, शाहु यांच्या विचारांचं राज्य येवो अशी इच्छा व्यक्त करतो, असा टोला त्यांनी सरकारला लगावला.

क्रांती ज्योती सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगाव येथे जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारणार या घोषणेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

– नायगावमध्ये “सावित्री सृष्टी” उभारणार

– भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम मार्गी लावणार

– नायगाव-मांढरदेवी रस्त्याचे काम करणार

– उपसा सिंचन योजनांची 81 टक्के वीजबिले सरकार भरणार

– फुले दाम्पत्यांच्या भारतरत्नसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

– संत सावता माळींचे जन्मस्थान असलेल्या अरणचा विकास करणार