सोलापूरनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उस्मानाबाद दौरा, तारीख ठरली

| Updated on: Oct 18, 2020 | 11:25 PM

पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवार दि 21ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिली.

सोलापूरनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उस्मानाबाद दौरा, तारीख ठरली
Follow us on

 उस्मानाबाद : पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी (21ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिली. (Cm Uddhav thackeray Inspection tour osmanabad)

उद्धव ठाकरे हे 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सोलापूर विमानतळावर येतील. त्यानंतर सकाळी 10.15 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव व अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील आणि त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते सोलापूरच्या दिशेने रवाना होतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी 20 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हा पाहणी दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा दिवसभर होती. मात्र हा दौरा बुधवारी 21 ऑक्टोबर रोजी आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे सोमवारी सोलापूर व बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा असल्याची माहिती दिली आहे.

शरद पवार यांनी पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत असून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी होत आहे.

मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा

मुख्यमंत्री उद्या 19 तारखेला सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसाचा दौरा असणार आहे. ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत

शरद पवारांची बळीराजाशी ‘मन की बात’

शरद पवार यांनी आज तुळजापूरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत. कांकाब्रा ते सास्तुरा दरम्यान शरद पवार यांना तीनवेळा रस्त्यात गाडी थांबवावी लागली. या गावांना भेटी देताना शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली.

तेव्हा लोहारातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. या शेतकऱ्यांच्या हातात पावसात भिजल्यामुळे वाया गेलेली पिके होती. ही पिके शेतकऱ्यांनी शरद पवार यांना दाखवली. आम्ही दुबार पेरणी केली, पण पावसामुळे ती वाया गेली. त्यामुळे आता किमान पुढील पेरणीआधी पंचनामे होऊन आम्हाला आर्थिक मदत द्या, असे शेतकऱ्यांनी शरद पवार यांना सांगितले. यावर शरद पवार यांनी पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या नुकसानीची नीट माहिती द्या, अशी सूचना शेतकऱ्यांना दिली.

(Cm Uddhav thackeray Inspection tour osmanabad)

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार